(क्रीडा)
गेल्या महिन्यात झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही, पण बांगला देशात सध्या सुरू असलेल्या महिला संघाने मात्र फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. आज (१५ ऑक्टोबर) महिला आशिया चषकाच्या फायनलचा थरार रंगणार आहे. स्पर्धेचा प्रबळ दावेदार भारत आणि श्रीलंका अंतिम सामन्यात आमने-सामने असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ सातव्यांदा आशिया चषकाचा किताब पटकावणार का? हे पाहण्याजोगे असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होईल.. भारतीय महिलांनी आशिया चषकात केवळ एका पराभवाचा सामना करून अंतिम फेरी गाठली आहे.
महिला आशिया चषक स्पर्धा यापूर्वी सात वेळा झाली आहे. त्या प्रत्येक स्पर्धेत भारत अंतिम फेरी खेळला आहे. गेल्या स्पर्धेचा अपवाद वगळता भारताने ही स्पर्धा सहावेळा जिंकली आहे. गेल्यावेळी बांगला देशच्या महिला संघाने आशिया चषक जिंकला. यंदा बांगला देश बाद फेरीत आलाच नाही. त्याच्या जागी श्रीलंका संघाने मुसंडी मारली. पुरुष आशिया चषक संघाप्रमाणे श्रीलंकेच्या महिलाही अनपेक्षित धक्का देऊ शकतात, त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला सावध राहावे लागेल.
भारताकडून सर्वच खेळाडू फिट आहेत आणि विशेष म्हणजे सगळेच फार्मात आहेत. फलंदाजीत स्मृती, हरमनप्रीत यांनी गेल्या काही सामन्यांत फारसे मोठे योगदान दिले नसूनही भारताने सामने आरामात जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय महिला संघ आज सातव्यांदा आशिया चषक उंचावताना दिसेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
➡️ सामन्याची वेळ : दुपारी १ वाजता