रत्नागिरी : आशा सेविकांच्या महाविकास आघाडीने अन्याय केला आहे. त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा आपण नक्की करू, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. शिल्पा धनंजय मराठे यांनी केले.
आशा सेविकांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत या संदर्भात 7 जुलै रोजी होणाऱ्या अधिवेशनामध्ये आमदार प्रसाद लाड, आमदार रवींद्र चव्हाण तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार प्रविण दरेकर यांच्या मार्फत शासनाचे लक्ष वेधणार आहोत, असे सौ. मराठे यांनी स्पष्ट केले.
सौ. मराठे म्हणाल्या, मा. मुख्यमंत्री महोदयांनी आशा सेविकांचे कोरोनाच्या काळातील कामकाज हे फार उत्तम आहे असे उदगार काढले. परंतु आशासेविकांनी प्रामुख्याने केलेली मानधन वाढ व आरोग्य विमा कवच या प्रामुख्याने मागण्या मान्य झालेल्या नाहीत. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना दिलासा मिळण्या ऐवजी दुःख व यातना सहन कराव्या लागत आहेत.
प्रत्येक वेळी मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री दरवेळी आशा सेविकांच्या मागण्यांच्या घोषणा करतात. प्रत्यक्षात त्यांना आशेवर ठेवले जाते. हे अत्यंत चुकीचे आहे. स्वतःच्या परिवाराची चिंता न करता आरोग्य सेवा देणं हेच उद्दिष्ट समोर ठेवून या सेविका गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळात काम करत आहेत. त्यामुळेच त्यांना न्याय मिळवून देऊ, असा विश्वास सौ. शिल्पा मराठे यांनी बोलून दाखवला.