रत्नागिरी : दिव्यांगांना समाजाच्या प्रवाहात आणणे आणि आई-वडिलांसारखे कठीण काम आविष्कार संस्था करत आहे. दिव्यांगांना समावेशनाचा अधिकार, कौशल्य विकसन, समाजाच्या प्रवाहात येण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पुरवण्यास आविष्कार संस्था सक्षमपणे काम करत आहे. त्यांच्यासाठी झोकून काम करत आहे. आज प्रकाशित झालेल्या स्वयंसेतू अभ्यासक्रमामुळे दिव्यांगांकरिता सुलभ शिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी मिळतील, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा सचिव तथा न्यायाधीश आनंद सामंत यांनी केले.
आविष्कार संस्थेच्या स्वयंसेतू अभ्यासक्रम (प्रालेख) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, संस्थाध्यक्ष सी. ए. बिपीन शाह, सचिव संपदा जोशी, उपाध्यक्ष दीप्ती भाटकर व्यासपीठावर उपस्थित होते.
सी. ए. बिपीन शाह यांनी संस्थेची माहिती दिली. कोरोना महामारीतही ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. नवनवीन उपक्रम राबवायचे असल्याबद्दल सांगितले. सौ. सविता कामत विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका वैशाली जोशी यांनी पीपीटीच्या माध्यमातून संस्थेचा इतिहास थोडक्यात मांडला. कार्यकारिणी सदस्य सचिन सारोळकर आणि मुख्याध्यापिका वैशाली जोशी, विशेष शिक्षिका मानसी कांबळे व लीना घुडे यांनी अभ्यासक्रम बनवला आहे. यासंदर्भात मानसी कांबळे यांनी परिपूर्ण माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करून शाळापूर्व अवस्थेपासून समाजाच्या मुख्य प्रवाहात येईपर्यंतचा यात विचार केला आहे. राज्यभरातील विशेष शाळांमध्ये हे पुस्तक दिले जाणार आहे. दिव्यांगांच्या वैयक्तिक स्वयंपूर्णता, सामाजिक, रोजगार क्षमता, ही अभ्यासक्रमाची महत्त्वाची प्रयोजने याने साध्य होतील, असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी न्यायाधीश आनंद सामंत म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात आमचा संस्थेशी जास्त संपर्क होता. ऑनलाईन शिक्षण असले तरी बाकीचे शालेय उपक्रम थोडे थांबले होते. आपण त्यातून बाहेर पडतोय. दिव्यांगांना समाजात चांगली वागणूक मिळाली पाहिजे. याकरिता जागरुक होण्याची गरज आहे. हे काम विधी सेवा प्राधिकरण करते. अधिकारांची अमलबजावणी झाली पाहिजे. प्रत्यक्ष अधिकार पोहोचण्यासाठी संस्था, विविध कार्यालये यांच्याकडून योजना असू देत. सर्वांचा सहभाग घेऊन समन्वय साधला जातो. लोकांना कायदेविषयक माहिती दिली जाते. योजना राबवण्यात अडथळा येत असेल तर सर्व प्रकारची मदत विधी सेवा प्राधिकरण देत आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी हेसुद्धा याचे सदस्य असून त्याकरिता मदत करतात. कोणत्याही चळवळीचा उगम हा छोट्या प्रवाहात असतो.
या वेळी डॉ. आठल्ये म्हणाले की, नवीन अभ्यासक्रम तयार करणे कठीण काम आहे. या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत. त्यात काळानुरूप बदल होत जातील. आविष्कार संस्थेत नियोजनबद्ध कामकाज चालते. सामान्य शाळांत ज्या गोष्टी पाहायला मिळत नाही त्या इथे पाहायला मिळतात. वेगवेगळ्या कल्पनांवर, सूक्ष्म स्वरूपात काम चालू आहे. असेच वेगवेगळे उपक्रम पाहायला मिळोत.
या वेळी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे, माजी मुख्याध्यापिका शमीन शेरे यांच्यासमवेत, संस्था सदस्य डॉक्टर राजेंद्र कशाळकर आणि माजी शिक्षिका वैशाली कानिटकर, हितचिंतक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय कार्यशाळा व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन सचिन सारोळकर यांनी केले. डॉ. शरद प्रभुदेसाई यांनी आभार मानले.