(मुंबई)
शिवसेनेत अभूतपूर्व बंड होऊन नाट्यपूर्ण घडामोडीला एक वर्षाचा कालावधी होत आहे. या काळात उद्धव ठाकरे गटाला एका मागून एक धक्क बसले आहेत. मात्र आता उद्धव ठाकरे गट कात टाकण्याच्या तयारीत आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी तसेच राज्यातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच शिवसेना पॉडकास्ट स्वरुपात येत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याची घोषणा केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की,”लवकरच घेऊ येत आहोत, जनतेच्या मनातले प्रश्न आणि त्यांची थेट उत्तरं… ‘शिवसेना पॉडकास्ट ‘स्वरुपात!’ आवाज कुणाचा’ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत युट्यूब पेजवर”
‘आवाज महाराष्ट्रा’चा असं या पॉडकास्टचं नाव असून यामध्ये शिवसेनेची अधिकृत भूमिका आणि विविध राजकीय विषयांवर चर्चांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः तरुणांमध्ये सध्या पॉडकास्ट हा प्रकार लोकप्रिय असल्यानं याच तरुण वर्गाला आकर्षित करण्याचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे.
शिवसेनेचेहे पॉडकास्ट कधीपासून सुरु होणार याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र ज्या युट्यूब चॅनेलवरुन हे पॉडकास्ट प्रसारित होणार आहे. त्या ShivSena UBT चॅनेलवर सध्या शिवसेनेनं २०१९ मध्ये आलेलं ‘शिवसेना गीत’ अपलोड करण्यात आलं आहे.