रत्नागिरी : आर्थिक विकास साधण्यासाठी बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी केले.
अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे बँक ऑफ इंडिया अग्रणी बँक तर्फे जिल्ह्यात क्रेडीट आऊटरिच कॅम्पेनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील व उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते ग्राहकांना यावेळी व्यापार कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज आदि कर्ज मंजूरीचे पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक केशवकुमार , अग्रणी बँकचे व्यवस्थापक एन. डी. पाटील, कुमार प्रमोद सिंग, मनीष त्रिपाठी, कृषी विभागाचे डी.के. जाधव आदि मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते.
करोना काळात बिघडलेले अर्थचक्र हळूहळू पूर्ववत होत असून रोजगार, व्यवसाय, नोकरी मध्ये हळूहळू गती देण्यात येत आहे. या अर्थचक्राला अधिक गती देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून बँकामार्फत विविध क्रेडीट कर्जच्या योजना राबविण्यात येत आहेत. तरी आपला आर्थिक विकास साधण्यासाठी बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी केले.
ते म्हणाले, येथील स्थानिक पिंकांचा विचार करुन वेगवेगळे उद्योग उभारणे गरजेचा आहे. या योजनांच्या माध्यमातून त्यांनाही मदत करण्यात येईल. येथील शेतकरी, मत्सव्यसाय करणाऱ्यांनी छोटे छोटे प्रोसेसिंग युनिट तयार करुन त्यासाठी लागणारे कर्ज राज्य अथवा केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना माध्यमातून घ्या आणि आपला आर्थिक विकास साधा. बचतगटांनी देखील उद्योग उभारावेत, त्यांना देखील बँकामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाईल.
श्री.केशवकुमार यांनी बँकांमार्फत देण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व आर्थिक विकास साधावा, असे आवाहन केले.
यावेळी कृषी, मत्स्य, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अर्थसहायाबाबतची माहिती तसेच बचतगट, स्वयंरोजगार यासाठी राबविण्यात येणाऱ्या बँकेच्या विविध योजनांची माहिती कुमार प्रमोद सिंग, मनिष त्रिपाठी व डी. व्ही. जाधव यांनी उपस्थित नागरिकांना यावेळी दिली.