(मुंबई)
सार्वजानिक आरोग्य विभागाकडून १० हजार ९४९ पदांसाठी २९ ऑगस्टपासून नोंदणी सुरू झाली आहे, मात्र दुर्गम भागांत तसेच अन्य काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत असलेली मुदत आता २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
आरोग्य विभागाकडून विभागाच्या अंतर्गत गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविली जात आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पण २२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज सादर करण्यास दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही आयुक्त आरोग्य सेवा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.