(क्रीडा)
कोरोना महामारी संपल्यानंतर यंदाच्या हंगामाची भारतात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत सात सामने पार पडले असून आठवा सामना जारी आहे. परंतु आयपीएलच्या कोणत्याही सामन्यात लाल अथवा हिरवी जर्सी घातलेले अंपायर्स मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणं आणि पीचवरच न्यायाधीशाची भूमिका बजावण्यासाठी पंच महत्त्वाचे असतात.
आयपीएलने देशातील युवा खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून अनेक खेळाडूंनी निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधले आणि भारतीय संघात देखील स्थान मिळवले. इंडियन प्रीमिअर लीगने युवा खेळाडूंना गुणवत्ता दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्याचबरोबर खेळाडूंची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. आयपीएलने अनेक अनोळखी खेळाडूंना जगासमोर आणण्याचं काम केलं आहे. फक्त भारतीय संघालाच नाही तर इतर देशांना देखील आयपीएलने खेळाडू दिले. आयपीलशी निगडित सर्वांनाच मालामाल होण्याची संधी देखील मिळाली. अनेक खेळाडूंवर अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागल्या. आयपीएलने फक्त खेळाडूंनाच मालामाल केले असे नाही, तर आयपीएलमध्ये सामनाधिकारी आणि पंच(अंपायर) यांना देखील मालामाल बनवले आहे.
यावर्षीच्या हंगामात अंपायरना आणि सामानाधिकारी यांना भरघोस पगार मिळत असल्याचे एका यादीतून समोर आले आहे. आयसीसीकडून एलिट आणि सर्वसाधारन असे दोन पंचांचे गट तयार करण्यात आलेले आहेत. त्यानुसार पंचांची वर्गवारी होत असते. एलिट गटातील पंचांना प्रत्येक सामन्यासाठी दोन लाख रुपयांचा पगार दिला जातो. याशिवाय प्रतिमॅच ६० हजार रुपयांचा भत्ताही एलिट पंचांना देण्यात येत असतो. अशा प्रकारे आयपीएलसह अन्य सामन्यांमध्ये पंचांची जबाबदारी पार पाडणाऱ्या अंपायर्सना २ लाख ६० हजार रुपयांच्या आसपास पगार मिळतो.
काही महिन्यांपूर्वीच आयपीएलमध्ये काम करणाऱ्या पंचांच्या पगारावत मोठी वाढ करण्यात आली होती. आयसीसीचे क्रिकेट सामन्यांमध्ये आणि आयपीएलच्या सामन्यांमध्ये कमी अनुभवाच्या पंचांना कमी महत्वाच्या सामन्याची जबाबदारी दिली जात असते. कमी अनुभव असलेल्या पंचांना आयपीएलच्या प्रत्येक मॅचसाठी ६० हजार रुपयांचा पगार देण्यात येत असतो.
इतरही अनेक सुविधा
आयपीएलच्या संपूर्ण हंगामात पंचांचा विमानप्रवास, भोजन, राहण्याची व्यवस्था आणि इतर खर्च हा देण्यात येत असतो. याशिवाय सामना सुरू असताना अंपायर्स त्यांच्या शर्टावर ज्या कंपनीची जाहिरात करत असतात, त्या कंपनीकडूनही त्यांना मानधन दिलं जातं. त्यामुळं कमी अनुभव असलेल्या अंपायर्सच्या तुलनेत आयसीसीच्या एलिट गटातील अंपायर्सना गलेलठ्ठ पगार आणि बक्कळ सुविधा देण्यात येत असतात.