मुंबई /प्रतिनिधी
राज्यमंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार असून या वेळी कोकणच्या वाट्याला आणखी एक मानाचे पान येणार आहे. कोकणची बुलंद तोफ, शिवसेनेचे आक्रमक आमदार भास्करशेठ जाधव यांना गृहमंत्रीपद देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर वापर करून शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना वेठीस धरले जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाल्यावर त्यांच्या जागी दिलीप वळसे-पाटील यांना राष्ट्रवादीने गृहमंत्री केले, परंतु शांत,संयमी ना. वळसे-पाटील अधिवेशन काळात प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत, उलट आ. भास्करशेठ जाधव यांनी सर्वच अधिवेशनात सभागृहाला व विरोधी पक्षाला अंगावर घेत प्रभावी काम करून अधिवेशन गाजवले. आपल्या अभ्यासू भाषणांनी अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. राज्याच्या हितासाठी काही मुद्दे त्यांनी जोरकसपणे मांडले. त्यामुळे आ.जाधव केंद्रस्थानी आले आहेत.
शिवसेनेवर होणारे प्रहार झेलण्यासाठी शिवसेनेला गृहमंत्रीपद हवे आहे. सध्या हे पद राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून ते तडजोडीने शिवसेना घेणार आहे. या पदासाठी अभ्यासू व अनुभवी ज्येष्ठ आमदार उत्कृष्ठ संसदपटू भास्करशेठ जाधव यांचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आहे. आ.जाधव हे १९९५ पासून आमदार आहेत, कामगार मंत्री तसेच नगरविकास, विधी व न्याय,बंदर विकास,वने आदी नऊ खात्याचे राज्यमंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी यापूर्वी प्रभावीपणे काम केले आहे. व आपल्या खात्याला न्याय दिला होता. विधीमंडळातील विविध आयुधांचा योग्यवेळी वापर करण्यात ते वाकबगार आहेत. तालिका सभापती म्हणून काम करताना सभागृहात गोंधळ घालणा-या भाजपच्या बारा आमदारांना त्यांनी निलंबित केले होते. त्यामुळे भाजप नेते त्यांचा वकूब ओळखून आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी भाजपच्या नेत्यांना नामोहरम केले होते. एक लढवय्या शिलेदार असणा-या आ.जाधव यांना गृहमंत्री करून भाजपवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. आ. जाधव यांना मंत्री केल्यास शिवसेनेवर होणारे शाब्दीक हल्ले व पलटवार परतवून लावण्यात ते मोलाची भूमिका बजावतील असा विश्वास पक्षनेतृत्वाला वाटत असावा यासाठीच ही खेळी खेळली जाणार आहे.