(नवी दिल्ली)
श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे, धक्कादायक माहिती समोर येत आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केलेली हत्यारे दिल्ली पोलिसांना सापडली आहेत. दिल्ली पोलिसांनी पाच धारदार चाकू जप्त केले आहेत. दरम्यान ही हत्यारे फॉरेन्सिक टीमकडे तपासासाठी पाठवण्यात आली आहेत. दिल्लीत झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ही हत्यारे दिल्ली पोलिसांना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताबने पोलिसांना सांगितले की, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी अनेक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी यातील ५ मोठे चाकू जप्त केले आहेत, जे तपासासाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी दिल्लीसोबतच वसई पोलिसांकडूनही तपास सुरू आहे. भाईंदर खाडी परिसरात वसई पोलिसांकडून तपास करण्यात आला. भाईंदर खाडीत आफताबने मोबाईल फेकल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. हा मोबाईल खाडीत मिळतो का या दृष्टीने खाडीमध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत आहेत.