(चिपळूण)
जिल्हा पुरवठा कार्यालयात येणाऱ्या रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा अवमान केला जातो, त्यामुळे जिल्ह्यातील दुकानदारांमध्ये व संघटनेमध्ये तीव्र नाराजी आहे. सदर अधिकाऱ्याचा शुक्रवारी झालेल्या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला. येत्या १५ दिवसात त्यांची बदली न झाल्यास धान्य वितरण बंद करण्यात येईल, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक – मालक संघटनेतर्फे निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक – मालक संघटनेची सभा चिपळूण येथे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांच्या निवासस्थानी झाली. या वेळी पुरवठा अधिकाऱ्यांबाबत चर्चा झाली. दुकानदारांच्या विविध समस्यांबाबत योग्य उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या काळात शासनाचे कोणतेही संरक्षण अथवा सहकार्य नसताना कार्डधारकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून धान्य वितरण केले. तरी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी शाबासकी किंवा धन्यवाद दिले नाहीत, उलट दुकानदारांना तपासणीच्या माध्यमातून एडीएसओंना बरोबर घेवून नाहक त्रास देण्याचे काम करीत आहेत. येत्या ५ दिवसात त्यांची बदली न झाल्यास धान्य वितरण बंद करण्यात येईल, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक – मालक संघटनेतर्फे देण्यात आला आहे.