(रत्नागिरी/प्रतिनिधी)
पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. संघर्षासाठीच त्यांचा दौरा होता, असा समज अनेकांनी केला आहे. मात्र तीन दिवसाचा त्यांचा हा दौरा कोकणासाठी फलदायी ठरला आहे. कोट्यवधीचा निधी त्यांनी दिला असून तसा अध्यादेश नुकताच निघाला आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांच्या पर्यटन विकासासाठी १८८ कोटी रुपये देण्यात आले असून त्यापैकी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडला ११६ कोटी रुपये मिळाल्याची माहिती, उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली.
झुम मिटिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे २८,२९,३० मार्चला कोकण दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये अनेक विकास कामे आणि मेळावे झाले. अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते. हा दौरा संघर्षासाठी असल्याचे बोलले जात होते. मात्र काल एक अध्यादेश निघाला आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी मंत्री ठाकरे यांनी ११६ कोटीचा निधी दिली आहे.
त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला २३ कोटी, रत्नागिरीला २५ तर रायगडला ६० कोटीचा निधी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील २५ कोटीमध्ये कसबा (ता. संगमेश्वर) येथील संभाजी स्मारकासाठी ५ कोटी, रत्नागिरी पालिकेच्या म्युझिएम शोसाठी ५ कोटी, वेळासला ५ कोटी, केळशीला २ कोटी, तारंगण गॅलरिसाठी १ कोटी ३६ लाख, दाभोळला १ कोटी ४० लाख, कालुस्ते बुद्रुकला १ कोटी २९ लाख, अंजर्लेतील गणपती १ कोटी २३ लाख, मुरुडला १ कोटी २१ लाख, रसाळगडला १ कोटी, हातिस विकासासाठी १ कोटी, राजापूराती नदी संगमासाठी ४८ लाख आदीसाठी हा निधी दिला आहे.
कोकणातील ५ जिल्ह्यांसाठी पर्यटन विकासाला १८८ कोटी ९९ लाख रुपये निधी देण्यात आला आहे. यापूरवी सिंधुरत्नसाठी निधी दिला आहे. विकास कामांसाठी त्यांचा दौरा होता, कोणत्याही संघर्षासाठी नाही, हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली, असे सामंत म्हणाले.