(देवरुख)
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र पर्शुराम तेंडुलकर यांना मुंबई विद्यापीठाचा “आदर्श प्राचार्य पुरस्कार” जाहीर झाला असून, या पुरस्कार समारंभाचे आयोजन शिक्षक दिनी म्हणजे ५ सप्टेंबर, २०२२ रोजी सर फिरोजशहा मेहता विद्यानगरी, सांताक्रुझ, मुंबई येथे केले आहे. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक कारकीर्दीचा या लेखाद्वारे घेतलेला आढावा.
मुंबई विद्यापीठातर्फे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांना मिळालेल्या हा दुसरा पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार सरांच्या उत्तम अध्यापन कार्यपद्धतीसाठी सन २०१४-१५ मध्ये “उत्कृष्ठ अध्यापक पुरस्कार” देऊन विद्यापीठाने गौरविले होते. आताचा पुरस्कार म्हणजे उत्तम अध्यापन कार्यासह उत्तम प्रशासकीय कौशल्याची मिळालेली पोचपावती आहे. सरांनी आपल्या महाविद्यालयीन अध्यापन कार्याची सुरुवात ५ सप्टेंबर, १९९१ रोजी केली, योगायोगाने हा दिवस शिक्षक दिनाचा होता. आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्राचार्य म्हणून ते ६ डिसेंबर, २००७ रोजी रोजी रुजू झाले.
प्राचार्य डॉ. तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची झालेली शैक्षणिक प्रगती
महाविद्यालयातील विज्ञान शाखेला सन २००८-२००९ मध्ये विद्यापीठाची मान्यता मिळून, सन २०१७-१८ मध्ये कायम स्वरूपी संलग्नता मिळाली. यानंतर विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षण २०१६-१७ मध्ये सेंद्रिय रसायनशास्त्र, २०१७-१८ मध्ये विश्लेषणात्मक रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयाने सुरू झाले. २०१७-१८ मध्ये रसायनशास्त्र विषयातील पीएचडी संशोधन केंद्राला मान्यता मिळाली. २०१९-२० मध्ये भूगोलशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण सुरू झाले. सन २०२०-२१ या वर्षात अनेक नवीन विषयातील पदवीची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. बॅचलर इन व्होकेशनल कोर्सेसमध्ये शाश्वत शेती, बँकिंग व वित्तीय सेवा आणि व्हिलेज रिसोर्स मॅपिंग साठी जिओ इन्फॉर्मेटिक्सचे शिक्षण सुरू झाले. भौतिकशास्त्र व भूगोलशास्त्र या दोन विषयातील पीएचडी संशोधन केंद्राचे प्रस्ताव सादर केले गेले, या दोन्ही विषयातील पीएचडी केंद्राला कालांतराने मान्यता प्राप्त झाली. महाविद्यालयातील २३ अनुदानित प्राध्यापकांपैकी १३ प्राध्यापक पीएचडी प्राप्त आहेत, तर इतर ५ प्राध्यापक आपले संशोधन करीत आहेत. महाविद्यालयातील सात प्राध्यापकांना विद्यापीठाने पीएचडी गाईड म्हणून मान्यता दिली आहे.
महाविद्यालयला ‘नॅक’ ने बहाल केलेला दर्जा
राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (NAAC), बेंगलोरने मार्च २०१० मध्ये महाविद्यालयाच्या तपासणीच्या दुसऱ्या फेरीत ‘बी’ ग्रेडसह सी जी पी ए चार बिंदूंवर २.८२ गुण दिले होते. तिसऱ्या फेरी महाविद्यालयाला चार बिंदूंवर आधारित ३.०६ गुण प्राप्त होऊन ‘ए’ ग्रेडचा सन्मान मिळाला. २०१९-२० मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग आणि मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयला स्वायत्त दर्जा (Autonomous Status) बहाल केला. कोकण विभागात स्वायत्त दर्जा प्राप्त करणारे पहिले महाविद्यालय ठरले. महाविद्यालयाचा हा स्वायत्त दर्जा ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत वैध राहणार आहे. या स्वायत्त दर्जामुळे महाविद्यालयात आता नवीन शैक्षणिक व उपयुक्त सहशैक्षणिक अभ्यासक्रम उपक्रम सुरू आहेत.
मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून प्राचार्य डॉ. तेंडुलकर यांनी स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या
रत्नागिरी उपकेंद्राचे प्रभारी संचालक म्हणून ४ जुलै, २०१८ ते १२ जानेवारी, २०२० पर्यंत कार्यभार सांभाळला. शैक्षणिक वर्ष २०१२ ते २०१४ करिता राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्य होते. ऑक्टोबर २०१८ परीक्षा समिती सदस्य,२०१५-१६ विद्यार्थी कल्याण समिती सदस्य, २०१७-१८ आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्थायी समिती सदस्य, रत्नागिरी उपकेंद्र परिसर विकास समिती सदस्य, २०१६-१७ लघु संशोधन प्रकल्पाच्या मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी विशेष समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. याचबरोबर त्यांनी विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून विविध महाविद्यालयांच्या स्थानिक चौकशी समितीसाठी, भौतिक शास्त्रातील प्राचार्य व सहाय्यक प्राध्यापक निवड व कॅस पदोन्नतीसाठी उपकुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून तसेच विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून विविध महाविद्यालयांना पीअर टीममधून भेटी, शैक्षणिक लेखापरीक्षणासाठी महाविद्यालयाचे पर्यवेक्षण केले. संगमेश्वर तालुक्यातील महाविद्यालयात विकास समिती सदस्य व सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
महाविद्यालयातील भौतिक व शैक्षणिक मूलभूत सुविधा
आंतरशाखीय संशोधन केंद्राच्या स्थापनेतून विविध विषयातील संशोधनाला गती मिळाली आहे. येणाऱ्या काळाची गरज ओळखून प्रात्यक्षिकावर आधारित पदवी शिक्षणसाठी आवश्यक १५,००० चौ. मी. व्होकेशनल सेंटरच्या इमारतीची बांधकाम प्रगती पथावर आहे. विजेच्या स्वावलंबनासाठी ७५ के. व्ही. चा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. सायन्स एक्टिव्हीटी अँड इनोव्हेशन सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे. इनडोअर स्टेडियम आणि ४०० मी. ८ लेनचा ट्रॅक पूर्णत्वाला आला आहे. विद्यार्थिनींसाठी सुसज्ज व सर्व सोयीनियुक्त वसतीगृह सुरू आहे. अशा प्रकारच्या शैक्षणिक, संशोधन, ऊर्जा, सांस्कृतिक व क्रीडा प्रकल्पांसाठी यूजीसीकडून ३०५.६४ लाख, सी आर एस निधीतून १४४.४९ लाख तर संशोधन उपक्रमांसाठी ४८.६१ लाख निधी प्राप्त झाला आहे, प्राप्त होत आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा
परदेशी भाषा प्रशिक्षण केंद्र व इतर कौशल्याधिष्ठित शैक्षणिक उपक्रमांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी एनएसएस, आर्मी आणि नेव्ही एनसीसी, योग, सायकल, स्पोर्ट्स व कल्चरल क्लब, संरक्षण क्षेत्रात करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र, पर्यावरण जागरूकता कार्यक्रम, जलसंधारण, घनकचरा व्यवस्थापन, हवामान राजदूत, संगणक साक्षरता, मतदार जागृती, नेतृत्व विकास शिबिरे, माऊंटन ट्रेकिंग, नौकानयन व स्कुबा ड्रायव्हिंग या सुविधा उपलब्ध आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती, उपयुक्त ग्रंथालय सुविधा आणि मोफत इंटरनेटची सोय करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठ युवा महोत्सव, विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, अविष्कार संशोधन स्पर्धा आयोजित केल्या जातात. विविध विषयांवरील सेमिनार, वेबिनार, वर्कशॉप, ई-कार्यशाळा आणि प्रदीर्घ स्वरूपाच्या व्याख्यानमाला जिल्हास्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत संपन्न होतात. महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रशासन, ग्रंथालय व परीक्षा भागांचे पूर्णतः संगणकीकरण करण्यात आले आहे.
महाविद्यालयाला मिळालेले विविध पुरस्कार व मानसन्मान
महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा २००९-१० “सर्वोत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार”,२०१४-१५ प्राचार्य सरांना “उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार”, विद्यापीठाचा महाविद्यालयाला २०१५-१६ मध्ये “सर्वोत्कृष्ठ एनएसएस युनिट पुरस्कार”, २०१६-१७ ‘मुंबई विद्यापीठ रक्तदान पुरस्कार’ (एनएसएस युनिट), दोन वेळा महाराष्ट्र शासनाचा जागर जाणिवांचा पुरस्कार प्राप्त झाला. महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनाही पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांना युवा उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार, डॉ. प्रताप नाईकवाडे यांना युवा वैज्ञानिक व मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट एनएसएस कार्यक्रमाधिकारी पुरस्कार तसेच आर. के. हेल्प अकादमी पुरस्कार, विवेक भोपटकर यांना विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार, प्रा. स्नेहलता पुजारी यांना सावित्रीबाई फुले उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार, डॉ. मीरा काळे यांना रमण जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली.
विद्यापीठाचा पुरस्कार मिळाल्यावर प्राचार्य डॉ. तेंडुलकर यांनी व्यक्त केलेल्या भावना
प्राचार्यांना मिळालेला पुरस्कार हा उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार असतो. आपल्याला हा दुसऱ्यांदा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आपल्या सर्वांची वैयक्तिक प्रगती तसेच महाविद्यालय व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ यांनी यासाठी दिलेले योगदान या पुरस्काराच्या माध्यमातून विद्यापीठाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. अशा प्रकारच्या पुरस्कारामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अजून वाढलेली आहे.आपण सर्वजण या वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून जास्तीत जास्त पुरस्कार महाविद्यालयाला मिळतील यासाठी प्रयत्नशील रहाल याची खात्री बाळगतो. पुन्हा एकदा आपले सर्वांचे अभिनंदन.
शब्दांकन- प्रा.धनंजय शांताराम दळवी,
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख.