(मुंबई)
आपल्याकडे काही रेशनच्या दुकानावर होत असणारा धान्याचा गैरव्यवहार सर्वपरिचित आहे. अनेकवेळा आपण त्याबाबतच्या बातम्याही वाचत असतो. काही दुकान मालक रेशनकार्ड धारकाला, त्याला सरकारकडून मिळणाऱ्या धान्यापेक्षा कमी धान्य देते. हे स्वतः रेशनकार्डधारकाला माहीत असतानाही त्याला त्याबद्दल विशेष काही करता येत नाही किंवा तक्रारीबाबत माहिती नसते. त्याला किती धान्य मिळणार, यासंबंधी त्याच्याकडे कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्याला दुकानदारासमोर नेहमीच नमते घ्यावे लागते. पण, राज्य सरकारने यावर एकप्रकारे तोडगा काढला आहे.
आता तुमच्यासाठी ठरलेल्या धान्याच्या कोट्यातून तुम्ही किती धान्य घेतले, याबद्दल माहिती देणारा एसएमएस तुम्हाला मिळणार आहे. सध्या सरकारकडून, रेशनकार्डवर नमूद असलेल्या कुटुंबांतील सर्वच सदस्यांचे आधार जोडण्याचे काम सुरू आहे. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये हे काम प्रगतिपथावर आहे. बहुतांश जिल्ह्यांत त्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपुढे गेले आहे. रेशनकार्डला आधार जोडल्याने कुटुंबातील व्यक्तींची नेमकी संख्या कळून त्यांना त्यानुसार धान्य वाटप होईल. त्यामुळे दोन रेशनकार्डवर नाव असणाऱ्यांची नावे वगळली जाणार आहेत. त्यामुळे धान्याची बचत होत असून, सरकारला हे धान्य अन्य गरजूंना देता येणार आहे.
या पार्श्वभूमीवर आता रेशनकार्ड मोबाइल क्रमांकाशी जोडले जात आहेत. यासाठी ग्राहक पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी नुकतीच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात हा निर्णय तातडीने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिलेल्या आदेशानुसार, कुटुंबातील एका सदस्याचा मोबाइल क्रमांक रेशनकार्डशी जोडला जाईल, या क्रमांकावर त्या कुटुंबाच्या सदस्य संख्येनुसार एकूण देय धान्यासाठा आणि आतापर्यंत खरेदी केलेल्या धान्यांचे प्रमाण या संदर्भात माहिती देणारा संदेश येईल. यातून रेशनच्या दुकानावर होणार भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होणार आहे.