(मुंबई)
राज्यात शिक्षण विभागात बढती किंवा बदली देणे, दाखल्यावरील दुरुस्त्या करणे, बडतर्फ शिक्षकांना पुन्हा कामावर रुजू करणे अशा कामांमधून गैरव्यवहार केलेल्या शिक्षणाधिका-यांच्या मागे आता लवकरच अंमलबजावणी संचालनालय (ईडी) लागण्याची चिन्हे आहेत. तसे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
राज्यातील ३२ शिक्षण अधिका-यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिक्षण विभागातील गैरव्यवहाराची काही प्रकरणे ‘ईडी’ कडे पाठविणार असल्याचे सूतोवाच फडणवीस यांनी केले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य आमदारांनी शिक्षण विभागातील गैरव्यवहारात सहभागी शिक्षणाधिका-यावर काय कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर फडणवीस यांनी शिक्षण विभागातील गैरव्यवहाराच्या काही प्रकरणांची ईडीमार्फत चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, ‘शिक्षण आयुक्तांनी शालेय शिक्षण विभागातील लाचलुचपत प्रकरणात सापडलेले वर्ग-एक आणि वर्ग-दोनमधील एकूण ३२ अधिका-यांची खुली अथवा गुप्त चौकशी करण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना १४ जून रोजी पत्र पाठविले आहे. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. यामधील १७ अधिका-यांची उघड चौकशी सुरू आहे. तर उर्वरित १५ अधिका-यांची उघड चौकशी करण्याबाबत कार्यवाही होत आहे. एकूण ३२ अधिका-यांपैकी २९ अधिका-यांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. तर उर्वरित तीन अधिका-यांच्या अभियोगपूर्व मंजुरीच्या प्रस्तावावर राज्य सरकार कार्यवाही करत आहे.’
याव्यतिरिक्त इतर १० अधिका-यांचीही चौकशी करण्याची विनंतीचे पत्रही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना ७ जुलै रोजी पाठविले आहे. तसेच, संबंधित अधिका-यांविरोधात विभागीय चौकशीची कार्यवाही शालेय शिक्षण विभागामार्फत सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.