(रत्नागिरी/प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील अशुध्द पाणी, अस्वच्छ परिसर, वैयक्तिक अस्वच्छता यामुळे ग्रामीण जनतेचे आरोग्यमान सुधारण्यासाठी आता गावागावात घनकचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन टप्पा – 2 च्या मार्गदर्शक सुचनांनुसार ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाने नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 1 हजार 506 गावांपैकी 900 गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. पावसाळयानंतर या योजनेतील कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे 2022-23 या आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहेत.
या अभियानांतर्गत नाचणे, रत्नागिरी येथे बायोगॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती व मैला, गाळ व्यवस्थापनातून खत निर्मिती असा एकूण 1 कोटी 30 लाखाच्या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. याच पध्दतीने गावातील कचरा एकत्र करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. लोकसंख्येनुसार निधी मिळणार असल्याने त्यानुसार आराखडे तयार केले जात आहेत.