(रत्नागिरी)
नव्या शैक्षणिक वर्षाचा ‘शाळा प्रवेशोत्सव’ गुरूवार 15 जून रोजी मोठ्या दणक्यात साजरा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 2 हजार 494 प्राथमिक शाळांमध्ये 10 हजार 952 नवागतांचे स्वागत वाद्य-संगिताच्या तालावर, जंगी मिरवणूकीने केले जाणार आहे. या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके, मोफत गणवेशाचे वितरण होणार आहे.
पुस्तकदिन साजरा करण्यासाठी जिल्ह्यात 1 ली ते 8 वी मध्ये शिकणाऱ्या 1 लाख 16 हजार 341 लाभार्थ्यांना 4 लाख 83 हजार 997 पाठपुस्तके वितरण करण्यात आली आहेत. तर इ. पहिलीच्या वर्गात 10 हजार 952 मुले वर्गात दाखलपात्र केली जाणार आहेत.
मुलांचे आनदंमयी स्वागत करण्यात येणार आहे. ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमामध्ये 6 ते 14 वयोगटातील एकही मुल शाळाबाह्य राहू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 100 टक्के पटनोंदणी, 100 टक्के उपस्थिती, गळतीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी मोफत पाठपुस्तकांबरोबरच शासनाकडून सर्व मुलींसह अनुसूचित जाती मुलगे, अनुसूचित जमाती मुली आणि दारिद्रयरेषेखालील मुलांना मोफत गणवेश वाटप करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 51 हजार 381 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति गणवेशासाठी 300 रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे जि.प. शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यासाठी 1 कोटी 54,14,300 इतके अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
या विद्यार्थ्यांचे आज जंगी स्वागत शाळेत केले जाणार आहे. या साठी शाळांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावं, अशा शब्दात केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. केसरकर म्हणाले, शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पाने देण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स देण्यात येणार आहेत. शेतीचे ज्ञान आवश्यक असल्याने यापुढे शेती विषय शिकवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.