(मुंबई)
शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा पार पडत आहे. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर तर ठाकरे गटाचा मेळावा हा शिवाजी पार्कवर होणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाचा हा दसरा मेळवा नाही तर शिमगा मेळावा आहे, ते त्यातून नुसता इतरांच्या नावाने शिमगा करणार, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा असून त्यांच्या धनुष्यातून कोणता बाण सुटणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये दोन गट पडले आणि शिंदे गटाने वेगळा सवतासुभा मांडला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगामध्ये पक्ष आणि चिन्हाचा वाद जिंकला आणि शिवसेना हा पक्ष आपलाच असल्याचे सिद्ध केले. त्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बाणाला अधिक धार आली आहे. यात काही शंका नाही. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या पुढील वर्षी होणार असून त्या पूर्वीचा हा मेळावा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे राज्यातील आपल्या कार्यकर्त्यांना आणि साथीदारांना कोणता संदेश देणार याचीही उत्सुकता आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहका-यांवर गद्दार असल्याचे सांगत टीका केली आहे. त्याला सडेतोड उत्तर आज एकनाथ शिंदे देण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार असून, दस-याच्या निमित्ताने त्यांची तोफ धडाडणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीची पार्श्वभूमी अधिक ठळकपणे होती. त्याशिवाय ठाकरे गटाला मैदान मिळवण्यासाठी हायकोर्टापर्यंत धाव घ्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या दसरा मेळाव्यावर उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर आणि भाजपवर टीकेचे बाण सोडले होते. यंदा उद्धव यांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील निशाण्यावर असणार आहेत तर अजित पवार यांच्याबद्दल काय बोलणार, याकडे राज्लयाचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाने या मेळाव्याचे तीन टीझर प्रदर्शित केले आहेत. यामध्ये शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. काही महिन्यातच होणा-या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे सरकार असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, उद्धव ठाकरे हे ‘इंडिया’ आघाडीबद्दलही उपस्थित शिवसैनिकांना आपली भूमिका अधिक स्पष्ट करून सांगण्याची शक्यता आहे.