(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ कुणबीवाडी येथील वरदान देवी नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने कुणबीवाडी येथे वरदान देवीच्या मंदिरात सध्या नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या नवरात्रौत्सवात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांची आखणी वरदान देवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आली असून त्यामध्ये मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा विविध गुणदर्शन कार्यक्रम असे विविधांगी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.
गेली आठ वर्षे वरदान देवी नवरात्र उत्सव मंडळ आपला उत्सव वरदान देवीच्या मंदिरात मोठ्या भक्तीभावात व श्रद्धेने साजरा करीत आहे. त्यामध्ये प्रतिवर्षी देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवामध्ये पूजाअर्चा, आरती, मंत्रपुष्प असे कार्यक्रम करण्यात सर्व कुणबी वाडीतील ग्रामस्थ एकत्रित होऊन मोठ्या भक्ती भावाने व एकोप्याने हा उत्सव साजरा करतात तसेच एकूणच विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील वरदान देवी नवरात्रौत्सव मंडळाचे सर्व तरुण कार्यकर्ते विशेष मेहनत घेतात. एकूणच यंदा कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता प्राप्त झाल्यानंतर आगरनरळ कुणबीवाडी येथील वरदान देवी नवरात्रौत्सव मंडळाचे कार्यकर्ते विविध कार्यक्रम राबवित असून शेवटच्या नवरात्र उत्सवाच्या सांगता कार्यक्रमापर्यंत वरदान देवी नवरात्र उत्सव मंडळ विविध कार्यक्रम राबविण्यासाठी मेहनत घेत आहेत.