(देवरूख / प्रतिनिधी)
आंबा घाटात काल रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास गाय मुखाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरला मोठा अपघात झाला. अवघड वळणाचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हलर गाडी खोल दरीत कोसळता कोसळता वाचली. अन्यथा 500 फूट खोल दरीत ट्रॅव्हलर कोसळून मोठी दुर्घटना व जीवितहानी झाली असती. दैव बलवत्तर म्हणून गाडी काठडयावर अडकली आणि 17 प्रवाशी बचावले.
सविस्तर वृत्त असे की, कोल्हापूरहून गणपतीपुळेला टेम्पो ट्रॅव्हलर चालली होती. मध्यरात्री गाय मुखाजवळ आल्यावर वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी 500 फूट खोल दरीत कोसळणार एवढ्यात कठड्याला अडकली. गाडीचा पुढील अर्धा भाग हा कठड्याच्या पलीकडे गेला होता. पण सुदैवाने तिथेच अडकली. प्रवाशांनी तर किंचाळ्या फोडल्या. खाली खोल दरी पाहून मृत्यू समोर दिसत होता. प्रवाशी थरथर कापत होते.
या अपघाताची माहिती साखरपा दुरक्षेत्राला कळताच पोलिस वैभव कांबळे, अर्पिता दुधाणे, प्रशांत नागवेकर, वैभव नटे आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जेसीबीला बोलावले. जेसीबीच्या साहाय्याने गाडीला बाहेर काढण्यात यश आले. सुखरूप बाहेर आल्याने थरथरलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि पोलिसांसह जेसीबी चालक जाधव यांचे आभार मानले.