(संगमेश्वर / प्रतिनिधी )
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या नेत्रावती एक्सप्रेसला कर्नाटकमध्येच भटकळ स्थानकावर 9 मार्चपासून 2023 पासून प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला होता. दरम्यान, कोकण रेल्वेच्या मार्गावर मागील काही वर्षांपासून नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या संगमेश्वर रोड थांब्यासाठी आंदोलने करूनही रेल्वेने थांबा मंजूर केला नाही. यामुळे एकाच मार्गावरील दोन राज्यांमध्ये कोकण रेल्वेचा दुजा भाव स्पष्ट झाला आहे. कर्नाटकातील निवडणुका होणार असल्याने तेथील स्थानिक नेत्यांनी भटकळ स्थानकासाठीचा थांबा प्रायोगिक तत्त्वावर मंजूर झाला. त्याच थांब्याला आता विस्तार देऊन कर्नाटकातील प्रवाशांवर खिरापत वाटण्यात आली आहे अशी माहीती संदेश जिमन यानी दिली आहे.
याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम्दरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस (16345) 9 मार्चपासून रोजी भटकळ स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा दिला होता. परतीच्या प्रवासात म्हणजे तिरुअनंतपुरम् ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावताना नेत्रावती एक्सप्रेस (16346) 9 मार्च 2023 पासून भटकळ स्थानकावर थांबा दिला. पुढील सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हे थांबा देण्यात आला होता. त्याचा आता विस्तार करण्यात आला आहे.
दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड स्थानकावर आणखी काही एक्सप्रेस गाड्यांना थांबे द्यावेत, अशी निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपकडून वारंवार मागणी केली जात आहे. निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेस ग्रुपच्या शिष्टमंडळाने बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्यालयात कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांच्याशी संगमेश्वर थांब्या संदर्भात अनेक वेळा चर्चा करून पत्रव्यवहार देखील केला.
मात्र, प्रत्येक वेळी कोकण रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित भारमान तसेच या संदर्भात रेल्वे बोर्डाकडे संगमेश्वर रेल्वे थांबा संदर्भात तीन वेळा प्रस्ताव विचारार्थ पाठवला आहे, असं सांगून यासाठी मागणी करणार्यांच्या हाती धुपाटणे दिले जात आहे. या संदर्भात रेल्वेकडून होत असलेल्या दुजाभावामुळेच संगमेश्वर वासियांना सोबत घेऊन निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपला आंदोलन करावे लागले होते. असेही जिमन यानी म्हटले आहे. मात्र, तरीही संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसला प्रायोगिक तत्त्वावर का होईना थांबा देण्याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही, तर येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोकणातील स्थानिक नेत्यांनी जर नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड थांब्या संदर्भातील जनतेच्या मागणीचा विचार केला नाही तर स्थानिक जनतेचा रोष येणाऱ्या निवडणुकीच्या वेळी यांच्या गाड्या रूळावरून घसरवायला एक कारण ठरू शकतो असा इशारा संदेश जिमन यानी दिला आहे.