(खेड)
गुरुवर्य ग.रा.चिकणे गुरुजी प्रतिष्ठान खेड व दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने पॅरा कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन, खेड तालुका कबड्डी असोसिएशन व पंच मंडळ यांच्या मान्यतेने दिनांक २२ व २३ एप्रिल रोजी प्रशांत सावंत यांच्या संकल्पनेतून दिव्यांग खेळाडूंच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन कै. किशोरजी कानडे क्रीडांगण खेड येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील रत्नागिरी अ, रत्नागिरी ब, नागपूर, अकोला, यवतमाळ, रायगड, सांगली, वर्धा येथील दिव्यांग खेळाडूं सहभागी झाले होते.
प्रशांत सावंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील २००हुन अधिक दिव्यांग खेळाडूंना एक नवीन व्यासपीठ मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूं हे विविध क्रीडा स्पर्धा मधून आज सहभागी होत आहेत. प्रशांत सावंत यांनी स्वतः जागतिक स्तरावर भारतीय दिव्यांग संघाचे प्रतिनिधित्व करून आत्ता पर्यत विविध पारितोषिक व पुरस्कार मिळविले आहेत. त्यांचा मानस हाच आहे की दिव्यांग व्यक्ती शरीराने दिव्यांग असली तरी मनाने खूप खंबीर असतात, त्यांना प्रोत्साहनाची व इतर खेळाडूंन प्रमाणेच विविध क्रीडा स्पर्धा मधून खेळायची संधी मिळावी. प्रशांत सावंत यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंसाठी विविध क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन करून त्यांनी ती संधी उपलब्ध करून दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडू हे जागतिक स्तरावर होणाऱ्या पॅरा ऑलम्पिक खेळामध्ये सहभागी होतील यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अनेक वर्षे दिव्यांग खेळाडू यांना प्रोत्साहन मिळावे या करीता प्रशांत सावंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात ऍथलॅटिक्स, क्रिकेट,कबड्डी अशा क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येत आहे. घरी बसणारी दिव्यांग व्यक्ती या स्पर्धांमधून सहभाग घेत आहे. दिव्यांग खेळाडूंना एकत्र करून त्यांना क्रीडा जगतात मानाच स्थान उपलब्ध करून एवढ्या मोठया स्पर्धेचे उत्तम प्रकारे आयोजन केल्या बद्दल एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री.संजय भोस्कर, पदाधिकारी सचिन पाखरे, राजू दुधनकर, धनंजय उपासनी, राहुल लोकूरवोळ यांच्या वतीने प्रशांत सावंत व सतिश उर्फ पप्पूशेठ चिकणे यांचा सत्कार पॅरा कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आला.