(नवी दिल्ली)
भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक खेळाडू रॉबिन उथप्पाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत रॉबिन उथप्पाने काल बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रॉबिन उथप्पाने एकदिवसीय आणि टी 20 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केले आहे. 2007 मधील विश्वविजेत्या टी 20 संघाचा तो सदस्य राहिला आहे. धोनीच्या नेतृत्वात उथप्पानं 2007 चा टी 20 विश्वचषक खेळत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. उथप्पाने २००६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
आपल्या ट्वीटमध्ये त्याने, मला भारतासाठी आणि कर्नाटकसाठी खेळल्याचा अभिमान आहे असे म्हटले आहे. या २० वर्षात मी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मात्र, प्रत्येक गोष्टीचा अंत असतोच, त्याप्रमाणे मी आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीदरम्यान मला पाठिंबा देणारे, बीसीसीआयचे अध्यक्ष, कर्मचारी, संघातील सहकारी, माझे प्रशिक्षक, आयपीएल संघ तसेच कर्नाटक क्रिकेट या सर्वांचे मी आभार मानतो, असेही त्याने निवेदनात म्हटले आहे.
रॉबिन उथप्पाने पाकिस्तान विरूद्धच्या बॉल आऊटमध्ये गेलेल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर प्रेक्षकांना केलेल्या अभिवादनाने सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली होती. उथप्पाने भारतासाठी ४६ एकदिवसीय आणि १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याने ९३४ धावा केल्या. तसेच त्याने ६ अर्धशतकही झळकावली आहेत. तर टी-२० मध्ये त्याने एका अर्धशतकासह २४९ धावा केल्या आहेत.