(आरोग्य)
देशात हार्ट अटॅकच्या घटना सतत वाढत आहेत. गेल्या काही काळात अनेक प्रसिद्ध लोकांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना समोर आल्या. ज्यात त्यांना जीव गमवावा लागला. धक्कादायक बाब म्हणजे तरूण वयातच अनेकांना हार्ट अटॅक येत असून त्यात ते जीव गमावत आहेत. हार्ट अटॅक रोखण्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे जाणून घेणं आहे की, आपल्या हृदयाच्या धमण्यांमध्ये काही अडथळा तर नाही ना.
हृदयविकाराचा झटका तेव्हा येतो जेव्हा हृदयाला अचानक रक्त पुरवठा होणे बंद होते, तर हार्ट फेल्युअर हा हृदयाशी संबंधित आजार आहे. ज्यामध्ये रक्त पंप करण्याची हृदयाची क्षमता हळूहळू कमकुवत होते. हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित पुरेशी माहिती नसल्यामुळे, अनेक वेळा त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते आणि यामुळे परिस्थिती कधीकधी गंभीर बनते. हृदयाच्या धमण्या तुमच्या शरीराच्या मुख्य रक्तवाहिन्या आहेत ज्या हृदयापर्यंत रक्त पोहोचवतात. जर यात काही गडबड झाली किंवा यात कशाप्रकारचे ब्लॉकेज आले तर सामान्यपणे तुम्हाला हार्ट अटॅकचे अनेक संकेत मिळतात.
काय मिळतात संकेत?
हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यावर तुम्हाला हृदयात जडपणा वाटतो. थोडी मेहनत केली तर धाप लागते आणि छातीत वेदना, अस्वस्थता जाणवते. हे हार्ट अटॅकची लक्षण असू शकतात. थकवा, धाप लागणे, हृदयाची धडधड अचानक वाढणे हेही हार्ट अटॅक येण्याचे संकेत आहेत जे धमण्या देत आहेत. त्याशिवाय हृदयरोग, डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना छातीत होणारी वेदना किंवा दबाव हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो. जर एखाद्या रूग्णाला हे संकेत दिसत असतील तर त्यांनी लगेच कार्डियोलॉजिस्ट म्हणजे हृदयाच्या डॉक्टरला दाखवावे. खाकरून जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर, डायबिटीससारख्या आजारांची फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्ही हृदयाचं पूर्ण चेकअप केलं पाहिजे.
हृदयविकाराच्या आधी किंवा दरम्यान जाणवलेली काही लक्षणे सामान्यत: इतर आरोग्य-संबंधित रोगांशी जुळतात आणि या कारणास्तव लोक त्यांना सामान्य आरोग्य समस्या समजून चुकून दुर्लक्ष करतात. अशीच पाच कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
गुडघा आणि सांध्यांमध्ये सूज येणे
जर एखाद्या व्यक्तीला गुडघा किंवा सांध्याशी संबंधित कोणताही आजार असेल तर या माहितीशिवाय हृदयाशी संबंधित आजार त्याच्या मनात येत नाहीत. पण घोट्याला किंवा गुडघ्यात सूज येणे हे देखील तुमच्या हृदयाच्या कमकुवतपणाचे थेट संकेत आहे. कारण जेव्हा हृदय नीट कार्य करू शकत नाही तेव्हा घोट्याला आणि गुडघ्यांना सूज येते.
अशक्तपणा आणि थकवा
दिवसभर थकवा जाणवणे ही आजकाल लोकांमध्ये एक सामान्य समस्या बनली आहे. खराब जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे अनेकांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु हृदयाच्या फेल्युअर पूर्वी देखील, थकवा आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसू शकतात, ज्याला लोक सहसा गांभीर्याने घेत नाहीत. हृदयरोगी किंवा ज्यांना हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या आजाराचा धोका आहे, त्यांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
चक्कर येणे
काहीवेळा लोक अतिउष्णता किंवा इतर काही आरोग्याशी संबंधित समस्या म्हणून येणाऱ्या चक्करकडे दुर्लक्ष करतात. परंतु कधीकधी हे हृदयाशी संबंधित समस्यांचे लक्षण देखील असू शकते आणि म्हणूनच चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नये.
वारंवार खोकला
हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये खोकला आणि घरघर यांसारखी लक्षणेही दिसू शकतात. हे सहसा असे होते जेव्हा हृदय योग्यरित्या कार्य करत नसल्यामुळे, फुफ्फुसात पाणी जमा होऊ लागते आणि नंतर प्रतिक्रिया म्हणून, खोकला आणि घरघर यांसारखी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये.
हार्ट अटॅक आल्यावर काय करावं?
हार्ट अटॅकच्या सुरूवातीच्या संकेतांमध्ये छातीत वेदना, जडपणा, जबडा, पाठ किंवा डाव्या हातात झिणझिण्या, घाम येणे आणि अस्वस्थता जाणवते. असं जाणवलं तर तुम्ही लगेच मेडिकल इमरजन्सी हेल्पलाइन नंबरवर कॉल केला पाहिजे. मेडिकल हेल्प येईपर्यंत तुम्ही रूग्णाला एक एस्पिरिनची गोळी देऊ शकता.
काय आहे उपचार
असे रूग्ण ज्यांच्यात 70 टक्के कमी ब्लॉकेज आहे, त्यांच्यावर औषधांनी उपचार होऊ शकतात. लक्षणांसोबत जर 75 टक्क्यांपेक्षा अधिक ब्लॉकेज असतील तर रूग्णाला एंजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करावी लागू शकते.
हृदय कसं निरोगी ठेवावं
– तंबाखूचं सेवन बंद करा
– दारूचं सेवन बंद करा
– डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी त्यांची नियमित टेस्ट करा.
– जास्त तणाव घेऊ नका
– दररोज कमीत कमी 7 ते 8 तास चांगली झोप घ्या
– हेल्दी फूड खा, जास्त मीठ खाऊ नका.
– वजन कंट्रोलमध्ये ठेवा.
– नियमितपणे एक्सरसाइज करा.
(टीप : वरील लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे, आपल्याला काही त्रास जाणवत असल्यास आपल्या डॉक्टरांच्या सल्यानुसारच उपचार पद्धती वापरा)