(कोल्हापुर)
ठाकरे आणि शिंदे गटात अनेक महिने कायदेशीर लढाई झाल्यानंतर आता आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं आहे. त्यामुळं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी थेट निवडणूक आयुक्तांवरच गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय या सर्व प्रकरणासाठी ठाकरेंनी भाजपसह मोदी-शहांना जबाबदार धरलं आहे. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. असंगाशी संग केल्यामुळं काय होतं, हे आज ठाकरेंना कळालं असेल, ज्यांच्यासोबत ठाकरेंनी युती केली होती, त्यांनीच ठाकरेंना रस्त्यावर आणून सोडल्याचं सांगत फडणवीसांना ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोल्हापुरातील भाजपच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना सत्तेची खुर्ची महत्त्वाची वाटली म्हणून त्यांनी विरोधकांसोबत संसार थाटला. त्यासाठी त्यांनी पंचवीस वर्षांच्या युती सोडली. पण काळाचा महिमा असा की असंगाशी संग केल्यामुळं काय होतं हे त्यांना कळलं असेल. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केली, परंतु या पक्षांनीच उद्धव ठाकरेंना रस्त्यावर आणून सोडलं, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचा वारसा चालवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं नाव आणि चिन्ह मिळालेलं आहे. त्यामुळं आता भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या सत्तेची सुरुवात कोल्हापुरातून करुयात, असा संकल्पही फडणवीसांनी केला आहे.