(फुणगूस / एजाज युसूफ पटेल)
पाटी-पेन्सिल, दप्तर मला पुन्हा एकदा पाठीवर घ्यायचंय, कार्यलयीन सॅक घरी ठेऊन आज पुन्हा एकदा मला शाळेत जायचंय… शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडास्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विध्यार्थ्यांनी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण इतके मोठे झालो हे सर्वजण विसरूनच गेले होते. निमित्त होते ते फुणगूस येथील नवजीवन विद्यालयातील तब्बल ३४ वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींच्या पुनर्भेटीचे. एकमेकांचे बदललेले चेहरे, राहणीमान आणि बोलीभाषा यांचे निरीक्षण करीत तब्बल ३४ वर्षांनी एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या बालपणातील आठवणीने अनेकांचे डोळे आंनदाश्रूने भरून आले.
सन १९८८-८९ कालावधीत दहावी वर्गापर्यंत सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र दहावीची परीक्षा दिल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले.कुणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेले तर कुणी नोकरी व्यवसायासठी परदेशात,कुणी स्वतःच्या व्यवसायात, नोकरीत सक्रिय झाले. त्या काळात मोबाईल अथवा फोनची अशी सोय नव्हती. त्यामुळे नंतर कोण कुठे स्थायिक झाले याची कोणतीच माहिती वर्गमित्रांना नव्हती.मात्र आताच्या मोबाईल युगात प्रशांत सुर्वे यांनी एक-एक करून वर्ग मित्र-मैत्रिणींचे मोबाईल नंबर गोळा करून यातूनच नवजीवन विद्यालय १९८९ असा व्हाट्सअप्प ग्रुप तयार केला.आणि स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला.
३४ वर्षांनी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून त्यावेळच्या शाळासोबतींची पुनर्भेट घडवून आणणे ही तेवढी साधी सोपी गोष्ठ नाही.तरीही प्रशांत सुर्वे यांनी पुनर्भेटीचे शिवधनुष्य पेलून ते अखेर यशस्वी करून दाखवलेच.या स्नेहमेळाव्याला सुमारे ३४ वर्षांनी विध्यार्थी-विध्यार्थीनी एकत्र आलेले पहायला मिळाले.३४ वर्षांपूर्वीचा प्रत्येकजण आणि आत्ताचा प्रत्येकजण हे आठवताना आणि पाहताना खरे तर कोणी फारसे एकमेकांना ओळखू शकले नव्हते.परंतु येथील इरफान स्टोअर्स च्या दुकानासमोर सर्वजण एकत्र येऊन एक दुसऱ्याला मिठाई देत पुनर्भेटीचा आनंद सोहळा पार पाडला.
वर्गमित्रांना श्रद्धांजली; स्मृतींना उजाळा
याच बॅच मधील दोन वर्गमित्रांनी जगाचा निरोप घेतला, त्यामध्ये विलास देसाई एस.टी वाहक यांचा महाड येथील पूल दुर्घटनेत अपघाती मृत्यू झाला आणि अशोक कांबळे यांचा प्रदीर्घ आजारपणाने मृत्यू ओढवल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे हा स्नेहमेळावा साजरा करत असताना उपस्थितांना त्यांची आठवण सर्वांना सतावत होती. या वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. त्यांच्या सोबत त्यावेळी घालवलेली सुख-दुःखाची क्षण,केलेली दंगा-मस्ती, रुसवे-फुगवे याचा फ्लॅश बॅक सर्वांच्याच समोरून जात होता. त्यांच्याही स्मृतींना मित्रांनी न विसरता अनेकांनी उजाळा दिला.