(रत्नागिरी)
अवैध दारू व्यवसाय आणि विदेशी दारूची बेकायदा वाहतूक रोखण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आहे. रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गेल्या वर्षभरात भरीव कामगिरी करत अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ४४८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये ९३२ जणांना अटक करून १४ वाहने जप्त करण्यात आली तर एकूण २ कोटी ३१ लाख ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातून प्रामुख्याने जास्तीत जास्त गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक होते. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दापासून ते अगदी खेडपर्यंत उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके कार्यरत असतात तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी गावठी हातभट्टीची दारू काढली जाते आणि तिची बेकायदेशीर विक्रीही होते. या बेकायदेशीर मद्यविक्रीचा राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होतो. हे रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग सक्रिय आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या वर्षामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये ९२१ वारस आणि ५२७ गुन्हे बेवारस म्हणून दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ९३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वर्षभरात केलेल्या या कारवाईत हातभट्टीची दारू आणि त्यात वापरण्यात येणाऱ्या हानिकारक रसायनाचा नाश करण्याची धडक मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत २९ हजार ८२५ हातभट्टींची दारू आणि ६ लाख ७४ हाजर लिटर रसायन नाश करण्यात आले. तसेच ३९६.१८ बल्क लिटर देशी मद्य, ३४३.८१ बल्क लिटर बिअर, ६० लिटर ताडी आणि ४७४१.२५ बल्क लिटर राज्यातील मद्य जप्त करण्यात आले. उत्पादन शुल्कच्या या कारवाईत १४ वाहने जप्त करण्यात आली.
एकूणच वर्षभराच्या कारवाईत २ कोटी ३१ लाख ७१ हजार ८७२ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापुढेही हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची कारवाई अशी पुढे सुरू राहणार आहे तसेच परराज्यातील मद्याच्या वाहतुकीवरही बारीक लक्ष राहणार आहे.