(गणपतीपुळे / वैभव पवार)
कोकणातील फळांचा राजा म्हणून आणि रत्नागिरी हापूस अशी देशविदेशात ओळख निर्माण केलेल्या आंबा पिकाचे यंदाच्या आंबा मोसमात मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे करपा रोगाचा प्रादुर्भाव आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस याचा परिणाम सध्या मोठ्या प्रमाणावर आंबा पिकावर होत असल्याने यंदा केवळ आंब्याचे दहा टक्केच पीक आल्याची माहिती चाफेतील प्रगतशील शेतकरी तथा आंबा बागायदार सुशांत मुळये यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, सध्या रत्नागिरी तालुक्यातील चाफेसह नजीकच्या जाकादेवी, मालगुंड,वरवडे, निवेंडी, नेवरे, धामणसे या परिसरात सध्या आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव आला असून यंदा आंब्याचे पिक दहा टक्के असताना या रोगाची नवीन रोगाची भर पडल्याने अनेक आंबा बागायतदार सध्या चिंतेत पडले आहेत. सध्या करपा रोगामुळे झाडाच्या पानांची मोठ्या प्रमाणात पानगळ होत आहे. प्राथमिक स्वरूपात हा करपा रोग वाटत असला तरी कृषी विभागांनी आंबा बागांची प्रत्यक्ष पाहणी करून मार्गदर्शन करणे गरजेचे होते. मात्र वास्तविक सध्या कृषी विभागाच्या कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आंबा बागायतदारांना मार्गदर्शन केले जात नसल्याने मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.
एकीकडे निसर्गत: झाडांची पाने ही लाल रंगाची होऊन सुकून पडतात परंतु सध्या करपा रोगामुळे आंबा झाडाची पाने पांढरी होऊन सुकून जात आहेत. एकूणच यंदा आंबा पिकाला चांगल्या स्थितीत मोहरच पकडला नसल्याचे अनेक आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले आहे. तसेच कुठल्याही मोठ्या किंमतीच्या फवारणीची औषधे आंबा पिकावर वापरली तरी देखील कुठलाच परिणाम होत नसल्याने यंदा आंबा पिक केवळ दहा टक्केच झाल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले आहे.
एकूणच कोकणातील फळांचा राजा आणि विशेषतः रत्नागिरीचा हापूस अशी ओळख असलेल्या आंबा पिकाचे यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक आंबा बागायतदाराकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे याबाबत संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून शासनाकडे संबंधित आंबा बागायतदारांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.