(रत्नागिरी)
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर शारिरीक अत्याचार करणाऱ्या कोल्हापुरातील आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व २७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
विकास दिलीप जाधव (वय २४, रा. नावली, ता. पन्हाळा -कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना ११ सप्टेंबर २०१८ घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या मावशीने १२ सप्टेंबरला शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपी हा कोल्हापूरहून रत्नागिरीतील एका नगरात राहणाऱ्या नातेवाईकांकडे येत असे, तेथे त्याची ओळख पीडित मुलीशी झाली. ती अल्पवयीन आहे हे माहित असताना आरोपीने पीडित मुलीला ती कॉलेजला गेली असताना फुस लावून पळवून नेले. जाताना त्याने रत्नागिरीतील एका मंदिरात गांधर्वविवाह केला. तेथून त्याने तिला कोल्हापूरला नेले. तेथे तिच्याशी शारिरीक अत्याचार केला. त्यामध्ये ही मुलगी दोन महिन्याची गरोदर राहिली.
पीडित मुलगी ही मावशीकडे रहात होती. या प्रकरणी मुलीच्या मावशीने शहर पोलिस ठाण्यात तरुणाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादवी कलम ३६३, ३७६ (२) (५), ३७६ (२)(एन) आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉस्को) ३, ४ व ५,६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे करत होत्या. तपासात पोलिसांनी संशयितास अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. बुधवारी १७ ऑगस्ट रोजी या खटल्याचा निकाल येथील विशेष पॉस्को न्यायालयात लागला. सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले.
सरकारी अभियोक्ता ॲड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. विशेष पोस्को न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपीला ३६३ कलमाखाली २ वर्षे शिक्षा व २ हजार दंड, ३७६(२) (५) कलमाखाली १० वर्षे शिक्षा ५ हजार दंड, ३७६ (२) (एन) खाली १० वर्षे शिक्षा ५ हजार दंड तर पॉस्को ३, ४ मध्ये ७ वर्षे शिक्षा ५ हजार दंड आणि ५, ६ खाली जन्मठेप व १० हजार दंडाची असा एकूण २७ हजाराचा दंड ठोठावला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हवालदार सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.