(राजापुर)
मुंबई-गोवा महामार्गाचे काम, रस्त्यांची लागलेली वाट हा या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कळीचा मुद्दा ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही मुंबई-गोवा महामार्गाच्या धीम्यागतीने सुरू असलेल्या कामावर चिंता व्यक्त केली होती. त्यातच मार्गाचे काम पूर्ण झाले नसतानादेखील राजापूर तालुक्यातील हातीवले येथील टोल नाका सुरू करण्यात आल्याने स्थानिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया या व्यवस्थापनाखाली राजापूर हातीवले येथील टोल नाका सुरू करण्यात आला आहे. या टोल नाक्यावर कारसाठी वन वे ९० रुपये, तर ट्रक आणि बससाठी २९५ रुपये आकारले जाणार आहेत.
मागील ११ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम धीम्यागतीने सुरू आहे. रत्नागिरी ते पनवेल दरम्यान महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे, तर अनेक ठिकाणी रस्त्याचे काम रखडलेले आहे. याआधी २२ डिसेंबरला हातीवले येथील टोल नाका सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी या टोलला विरोध केला होता. सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंत टोल नाका सुरू होणार नसेल तर हातीवले टोल नाकाच का सुरू करण्यात येत आहे, असा सवाल त्यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी विचारला होता.