(रत्नागिरी)
सर्वोदय छात्रालय अमृत महोत्सव साजरा करत आहे. छात्रालयास शासकीय अनुदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाचा खर्च, दत्तक-पालक योजना, गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विद्यासंकुल विकसित करण्याचा संकल्प सोडलेला आहे. याकरिता माजी विद्यार्थी आणि समाजातील जास्तीत जास्त दानशुरांनी मदत करावी, असे आवाहन यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान व्यवस्था समितीचे सदस्य हरिश्चंद्र गीते यांनी आज येथे केले.
छात्रालयाच्या १९ व्या छात्र मित्र मेळाव्यात ते बोलत होते. दत्त मंगल कार्यालयात हा मेळावा रविवार रंगला. या वेळी व्यासपीठावर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, व्यवस्था समिती सदस्य बीना कळंबटे, रघुवीर शेलार, प्रमुख पाहुणे रमेश भाटकर, सर्वोदय पुरस्कार विजेते शिवराम जाधव उपस्थित होते.
श्रीमती यमुनाबाई खेर, पद्मविभूषण बाळासाहेब खेर आणि कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. अॅड. ढवळ यांनी सांगितले की, माजी विद्यार्थी व संस्थेचे हितचिंतक हे आपलेपणाच्या भावनेने जोडले जावेत या हेतूने २००४ पासून छात्रमित्र मेळावा आयोजित करत आहोत. रत्नागिरीसह गोपुरी आश्रम, मणीभवन मुंबई, लांजा, चिपळूण येथेही मेळावे घेतले आहेत.
प्रास्ताविकामध्ये रघुवीर शेलार यांनी सांगितले की, आजचा छात्र मित्र मेळावा आयुष्याच्या शिदोरीत भर घालणारा आहे. सर्वोदय छात्रालयाचे आतापर्यंत एक हजार माजी विद्यार्थी आहेत. छात्रालयाला ७५ वर्षे होत आहेत. यानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी संस्थेकरिता ५ टक्के योगदान द्यावे. २८ एप्रिलला मोठा कार्यक्रम होणार आहे. दयानंद परवडी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन उपाध्यक्षा जयश्री बर्वे यांनी केले. शिवप्रकाश चौघुले यांनी आभार मानले.
विद्यार्थी गहिवरले
माजी विद्यार्थी तथा जलसंपदा विभागातील वरिष्ठ लिपीक जयदीप कांबळे यांनी सांगितले की, मला छात्रालयात फक्त १०० रुपयांत प्रवेश मिळाला पण १०० कोटींपेक्षा जास्त संस्कार येथे मिळाले. माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. त्यांच्याप्रमाणेच अन्य बहुतांशी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून छात्रालयाचे व हरिश्चंद्र गीते यांचे आभार मानले. अनेक माजी विद्यार्थी गहिवरून आपल्या आठवणी सांगत होते. ८४ वर्षीय बाबाजी गिडये यांनीही मनोगतात छात्रालयाचे अनंत उपकार असल्याचे सांगितले. मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे यांनी मनोगत व्यक्त केले.
सुभाषित नवनीतचे प्रकाशन
हरिश्चंद्र गीते यांनी संपादित केलेल्या सुभाषित नवनीत या पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी बीना कळंबटे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्कृत साहित्यामध्ये सुभाषितांचे विशेष स्थान आहे. सुभाषितात चांगली व उपयुक्त मार्गदर्शक रचना केलेली असते त्यामुळे त्याचे संकलन केल्याचे श्री. गीते यांनी सांगितले