(चिपळूण)
चिपळूण गुहागर मार्गावरील कळवंडे फाटा येथे दुचाकी आणि मोटाची धडक झाली. यात मार्गताम्हाणे येथील कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण ज्ञानू शिंदे (वय ४८) गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्राथमिक उपचार करून कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र गुरुवारी त्यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.
लक्ष्मण शिंदे हे १९९७ मध्ये तालुका कृषी कार्यालयात सेवेत रुजू झाले होते. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील होते. सध्या ते मार्गताम्हाणे येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी बुधवारी ते मार्गताम्हाणे परिसरात निघाले होते. दरम्यान सकाळी नऊ वाजता कळवंडे फाटा येथे त्यांच्या दुचाकीस मोटारीने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते.
कोल्हापूर येथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, मुले, मुली असा परिवार आहे.