( छत्रपती संभाजीनगर )
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातासाठी आरटीओ अधिकारी जबाबदार असल्याचं सांगत दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. या दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असे या निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नाव असून दोघेही आरटीओ असिस्टंट इन्पेक्टर आहेत.
ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात असून दोनही आरटीओ अधिकाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. अपघात होताच आरटीओ अधिकारी त्या ठिकाणाहून पळून गेले, मग नंतर परत येऊन त्यांनीच अपघात झाल्याचा फोनही केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे.
समृद्धी महामार्गावर शनिवारी रात्री झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर २३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही आहे. नाशिकहून बुलढाण्याच्या सैलानी बाबाच्या दर्शनाला गेलेल्या पर्यटकांच्या ग्रुपवर काळाने घाला घातला. या अपघाताला आरटीओ अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप अपघातग्रस्तांनी केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील ३५ भाविक बाबा सैलाणीच्या दर्शनासाठी गेले होते. ते तेथून परतत असताना वाहनाला अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला धडक बसली. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. तसेच जखमींवर शासकीय खर्चांनी उपचार करण्याचे निर्देश दिलेत, तर पंतप्रधान मोदींनींही यावर शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.