(मुंबई)
गेल्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख खंडणी वसुली प्रकरण गाजत आहे. अनिल देशमुख खंडणी वसुली प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. माफीचा साक्षीदार बनण्यासाठी दिलेली सहमती ईडीनं (ED) मागे का घेतली? अशी विचारणा बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेनं केली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख याप्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. अनिल देशमुख सध्या जामीनावर बाहेर आहेत. अनिल देशमुखांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्याता आलाय. देशमुखांना जामीन मंजूर करताना हायकोर्टानं काही अटी घातल्या होत्या. त्यानुसार, अनिल देशमुखांना त्यांचा पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा करावा, तपास यंत्रणा आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही. तसेच, आठवड्यातून दोन दिवस त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. याशिवाय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तपासात संपूर्णपणे सहकार्य करण्याचे निर्देश अनिल देशमुखांना जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते.
तर सचिन वाझेनं ईडीच्या भूमिकेवर आक्षेप घेत सवाल उपस्थित केला आहे. यावर दिनांक १८ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे तपासयंत्रणेला कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. वाझेचा तळोजा तुरुंगातून मुंबई सत्र न्यायालयात पत्रव्यवहार सुरूच असून बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. अशातच आता या ट्विस्टमुळे प्रकरणाला नवं मिळणार का? हे आता लवकरच समजणार आहे. या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख मुख्य आरोपी आहेत.