(रत्नागिरी)
अधिवक्ता दिवसाच्या निमित्ताने अधिवक्ता परिषद, (कोकण प्रांत) तालुका आणि जिल्हा रत्नागिरी शाखांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि विविध न्यायालयांमध्ये ४० वर्षांहून अधिक वर्षे वकीली केलेल्या ज्येष्ठ विधीज्ञांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. रविवारी दत्तमंगल कार्यालयात हा हद्य सोहळा रंगला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश श्री. दिलीप जामखेडकर लाभले होते. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती अधिवक्ता प्रफुल्ल कुलकर्णी यांची होती. प्रास्ताविक अधिवक्ता परिषद रत्नागिरी तालुका कार्यकारिणी अध्यक्ष अधिवक्ता मनोहर जैन यांनी केले. १३ अधिवक्ता यांचा त्यांच्या वकीली क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर अधिवक्ता ए. एस. कदम, अधिवक्ता श्रीमती व्ही. ए. पाथरे, अधिवक्ता ए. व्ही. आगाशे, अधिवक्ता जी. एन. गवाणकर यांनी त्यांच्या वकिलीच्या कारकिर्दीतील विविध अनुभव आणि किस्से सांगितले.
माजी न्यायाधीश श्री. दिलीप जामखेडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात “समाजाला चांगल्या वकीलांप्रमाणेच कुशल न्यायाधीशांची गरज आहे”, असे विचार व्यक्त केले. तसेच तरुण वकीलांनी न्यायाधीश पदाकरिता जी परीक्षा घेतली जाते, त्याकरिता आवर्जून प्रयत्न करावेत, असे सांगितले. या सोहळ्याची सांगता स्नेहभोजनाने झाली. सूत्रसंचालन अधिवक्ता रोहित देव यांनी केले. आभार अधिवक्ता परिषद तालुका कार्यकारिणी सचिव अधिवक्ता अवधूत कळंबटे यांनी मानले.