(मुंबई)
अदानी समूह आता 3.5 अब्ज डॉलर (28,900 कोटी रुपये) उभारण्याच्या तयारीत आहे. यासाठी समूह आपल्या काही कंपन्यांचे शेअर्स संस्थात्मक गुंतवणूकदारांना विकण्याचा प्रयत्न करीत आहे. अदानी समूहाला हिंडेनबर्ग रिसर्च या अमेरिकन शॉर्ट-सेलर फर्मच्या अहवालानंतर लक्षणीय तोटा सहन करावा लागला. तेव्हापासून हा समूह विविध उपाययोजनांद्वारे आपले अस्तित्व मजबूत करण्यात गुंतला आहे. हा निधी देखील या उपायांचा एक भाग आहे.
अदानी समूह आपल्या तीन कंपन्यांचे शेअर्स विकून हा निधी उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. या कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी यांचा समावेश आहे. यापैकी अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ट्रान्समिशनच्या संचालक मंडळाने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर्स विकून सुमारे 2.5 अब्ज डॉलर (2,100 कोटी) उभारण्याची योजना आधीच मंजूर केली आहे. तर अदानी ग्रीन एनर्जीचे संचालक मंडळ पुढील काही आठवड्यात सुमारे 1 अब्ज डॉलर उभारण्याच्या योजनेला मंजुरी देऊ शकते.
संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ट्रान्समिशनने निधी उभारण्यासाठी भागधारकांची मंजुरी मागितली आहे. पैसे उभारण्याच्या योजनेला मंजुरी देण्यासाठी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या संचालक मंडळाची जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बैठक होऊ शकते. या संपूर्ण प्रक्रियेत अदानी समूह सुमारे 3.5 अब्ज डॉलर जमा करू शकतो. हा निधी समूहाच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल. निधीची योजना चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर्स जारी करून ही रक्कम उभी केली जाईल. युरोप आणि मध्य पूर्वेतील गुंतवणूकदारांनी या इश्यूमध्ये खप रस दाखवला आहे.