(लांजा)
तालुक्यातील कोंडये रांबाडेवाडी येथून बेपत्ता झालेल्या वैशाली चंद्रकांत रांबाडे या बेपत्ता महिलेचा खून झाल्याचे अखेर पोलीस तपासाअंती स्पष्ट झाले आहे. कोंडये येथीलच राजेंद्र गोविंद गुरव यान तिचा दि. २९ जुलै रोजी दुपारी कुवे येथील जंगलात खून केल्याचे या तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आरोपी राजेंद्र गुरव आणि मृत वैशाली रांबाडे यांच्यात प्रेमसंबंध होते आणि वैशाली हिने वारंवार पैशाचा तगादा लावला होता, असे पोलिसांनी सांगितले.
या बाबत लांजा उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोंडये रांबाडेवाडी येथील वैशाली चंद्रकांत रांबाडे (४८) ही दि. २९ जुलै २०२४ रोजी आपण कुवे येथे डॉक्टरकडे जातो असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती घरी न परतल्याने मुंबईहून पती चंद्रकांत रांबाडे हे गावी आल्यानंतर त्यांनी दिनांक ३० जुलै रोजी लांजा पोलीस ठाण्यात वैशाली रांबाडे ही बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर लांजा पोलिसांकडून या बेपत्ता वैशाली रांबाडे यांचा शोध सुरू होता.