(मुंबई)
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अर्जाच्या भाग २ मधील महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यासही शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग २ भरला होता. त्यातील ५२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी पसंतीच्या महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम भरून अर्ज सबमिट केले.
कोटा अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनाही हव्या असलेल्या महाविद्यालयात अर्ज करून ठेवता येणार असल्याने इन हाऊस कोट्यासाठी २३८१, व्यवस्थापन कोट्यांतर्गत ६३७ तर अल्पसंख्यांक कोट्यासाठी ३ हजार ८०६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले.
अकरावी प्रवेश अर्ज भाग २ भरण्यासाठी पहिल्या दिवशी २ लाख ३५ हजार ५२० विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यातील ६३ हजार ४६७ विद्यार्थ्यांनी भाग २ भरला. मात्र त्यातील ५६ हजार ६७६ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरला असला तर ५२ हजार ९११ विद्यार्थ्यांनी आपला अर्ज लॉक केला. त्यामुळे पहिल्या दिवशी अर्ज भाग २ भरण्यास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तसेच इन हाऊस कोट्यांतर्गत ४४ हजार ३५५ विद्यार्थी पात्र ठरले त्यातील २ हजार १५८ विद्यार्थ्यांनी आपला अर्ज लॉक केला. तर अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत ३७ हजार ८२३ विद्यार्थी पात्र ठरले त्यातील ३२४९ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले. व्यवस्थापन कोट्यांतर्गत २ लाख ३५ हजार ५२० विद्यार्थी पात्र ठरले असून, ४५० विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत.
अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग २ भरण्याची प्रक्रिया सुरु असून सीबीएसई विद्यार्थ्यांनांही महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरून अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या सीबीएसई विद्यार्थ्यांनी अद्यापही अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही त्यांना नोंदणी करून, भाग २ भरून प्रवेशसाठीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.