(रत्नागिरी)
मोठ्या शहरातील ‘ड्रग्ज’चे लोण आता रत्नागिरी सारख्या छोट्या शहरांमध्येही पसरले आहे. तरुण पिढी ‘ड्रग्ज’च्या आहारी जात असल्याने ‘ड्रग्ज’माफियांचे जाळे उद्धवस्त करण्यासाठी शहर पोलीस निरिक्षक विनित चौधरी यांनी शनिवारी मध्यरात्री शहरभर ‘ड्रग्ज ऑपरेशन’ राबविले. शहरातील ‘ड्रग्ज’माफियांची झाडाझडती घेत असतानाच शहरातील विविध भागात छापेमारी केली. सर्वत्र तपासणी सुरु असताना ब्राऊन, हेरॉईन घेवून रत्नागिरीत आलेल्या ‘ड्रग्ज’ माफियांच्या मोरक्यांसह चौघांना शहर पोलीसांनी अटक केली आहे. रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. शहर पोलीसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे.
रत्नागिरी शहरात महानगरातून ‘ड्रग्ज’चा पुरवठा केला जातो. रेल्वे, एसटी बस सारख्या सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या सेवांचा फायदा ‘ड्रग्ज’ माफिया घेतात. त्याद्वारे शहरात आलेले ‘ड्रग्ज’ टोळीच्या माध्यमातून शहरात विक्री केले जाते. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल केली जात. तर तरुण पिढीला ‘ड्रग्ज’च्या आहारी लावणारी टोळी रत्नागिरीत सक्रिय आहे.
‘ड्रग्ज’माफियांची टोळी उद्धवस्त करण्यासाठी शहर पोलीस निरिक्षक विनित चौधरी यांनी शनिवारी सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत ‘ड्रग्ज ऑपरेशन’ राबविले. अधिकारी, अंमलदार यांच्या स्वतंत्र टिम तयार करुन शहरातील विविध भागांसह एसटी स्टँड, रेल्वे स्थानक, मुख्य महामार्ग येथे पोलीसांच्या पथाकांनी छापेमारी केली. यापुर्वी ‘ड्रग्ज’ पुरवठा केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या सर्वाची झडती घेण्यात आली. ड्रग्ज ऑपरेशन रात्रभर चालू असल्याने ‘ड्रग्ज’ माफियांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या पार्सल गेटकडून पार्किंगकडे जाण्याच्या मार्गावर ‘ड्रग्ज’ पुरवठा व विक्री करणारे चौघे संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पथक प्रमुख पोलीस उपनिरिक्षक आकाश साळुंखे यांच्या निर्दशनास आले. त्यांच्यासह टिमने त्यांची चौकशी केली असता, त्यांनी उडाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता ‘ड्रग्ज’ टोळीचा म्होरक्या झहीर मेहमुद काझी (वय ४२, रा. गवलीवाडा) संदिप गोविंद शिवगण (रा. धनजीनाका) ,आकीब खालीद काझी (रा. गवलीवडा) तौसिफ आसिफ मिरजकर (रा. राहुल कॉलनी) यांच्याकडे २१.७८ ग्रॅम ब्राऊन, हेरॉईन आढळले. त्यानंतर चौघांना पोलीसांनी ताब्यात घेतले. पहाटे त्यांना शहर पोलीस स्थानकात आणून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सकाळी त्यांच्यावर एन.डी.पी.एस. ॲक्ट ८(क), २२ (ब), व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी जप्त केलेले ब्राऊन हेराईन रत्नागिरी शहरात विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली पोलीसांकडे दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री. विनीत चौधरी यांच्या कुशल नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक श्री. आकाश साळुंखे, श्री. प्रसाद घोसाळे, श्री. गणेश सावंत, श्री. प्रविण बर्गे, श्री. अमोल भोसले, श्री. आशिष भालेकर,श्री. विनय मनवल, श्री. रत्नकांत शिंदे,श्री. पंकज पडेलकर यांनी सदर कारवाई केली.