अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक व संस्थापक प्रा. श्याम मानव यांची हत्या करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्याने राज्यात खळबळ माजली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हत्या करण्याचा डाव आखण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून बागेश्वरपीठ धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज व अंधश्रद्धा निर्मुलन समितीमध्ये वाद रंगला आहे. त्यातूनच धीरेंद्र महाराजाच्या भक्ताकडून अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक, संघटक आणि प्राध्यापक श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. काल संध्याकाळी श्याम मानव यांच्या हत्येसाठी महाराष्ट्रात आलेल्या व्यक्तीला पुण्यात रेल्वे पोलिसांनी शस्रासहीत अटक केल्याची माहिती समोर आली आहे. अनिलकुमार उपाध्य (वय ४५) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिलकुमार हा सुरतवरून पिस्तुल घेऊन महाराष्ट्रात आला होता. त्याच्याकडे विनापरवाना पिस्तुल होतं.
मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज अलीकडे चर्चेत आले होते. बागेश्वर बाबा नावाने प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री महाराज लोकांचं मन वाचू शकतात, असा दावा करतात. याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना थेट आव्हान दिलं होतं. बागेश्वर बाबांनी त्यांच्याकडे असणारी दैवीशक्ती सर्वांसमोर दाखवावी. आम्ही त्यांना ३० लाख रुपये देऊ, असं श्याम मानव म्हणाले होते. यानंतर बागेश्वर बाबा नागपुरातील कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून गेले होते. यानंतर श्याम मानव यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. तसेच तुमचाही नरेंद्र दाभोळकर करू अशा धमकीचा एसएमएस श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवरही आला होता. धीरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरिष देशमुख यांनी केला होता.
अनिलकुमार उपाध्य ला सध्या पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.