(संगमेश्वर)
लहान मुलांबरोबर खेळण्यासाठी गेलेल्या चिमुकलीच्या अंगावर गरम पाणी पडून गंभीररीत्या ओवी किंजळे भाजल्याची घटना वांद्री (ता. संगमेश्वर) येथे घडली होती. या दुर्घटनेत गंभीररीत्या भाजून जखमी झालेल्या ओमी अमर किंजळे या तीन वर्षीय चिमुकलीचा शनिवारी (११ नोव्हेंबर) जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री अंत झाला.
ओवी ही त्यांच्या शेजारी राहणारी आरती अनंत किंजळे यांच्या घरी लहान मुलांबरोबर खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या अंगावर गरम पाणी पडल्याने ती गंभीररीत्या भाजली होती. तिच्या अंगावर गरम पाणी पडल्याचे कळताच तिच्या नातेवाइकांची धावाधावा सुरू झाली. तिच्या नातेवाइकांना रडूच आवरत नव्हते. त्याही परिस्थितीत तिला तत्काळ वांद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात तिचा अंत झाला. या चिमुकलीच्या मृत्यूनंतर वांद्री- किंजळेवाडीवर शोककळा पसरली आहे.
या घटनेबाबत संगमेश्वर पोलिस स्थानकात रविवारी (१२ नोव्हेंबर) आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.