(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते म्हणून चांगली ओळख निर्माण केलेले निलेश श्रीधर कदम यांनी आगामी पंचायत समिती निवडणूक माभळे गणातून कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती न घेता अपक्ष म्हणून लढवण्याचा घेतलेला निर्णय सध्या प्रचंड चर्चेत असून लोकांचा त्यांना आतापासूनच पाठिंबा मिळत आहे.
निलेश कदम हे वेळ, प्रसंग न पाहता लोकांच्या अडचणीच्या वेळी सर्वप्रथम धावून जाणारे अवलिया म्हणून ओळखले जातात. एखाद्याला मदत करण्यासाठी ते दिवस–रात्र, पाऊस–वारा, आपत्ती यांची काही पर्वा न करता कायम पुढाकार घेऊन धावून जात असतात.
सदैव मितभाषी, हसतमुख आणि जमिनीवर पाय ठेवून काम करणारे कदम यांचा जनसंपर्क ही त्यांची खरी ताकद आहे. तालुक्यातील कानाकोपऱ्यात त्यांचे नाव परिचित असून, सामान्यांपासून ते विविध समाजघटकांपर्यंत त्यांचा दांडगा संवाद सतत कायम आहे.
बँक ऑफ इंडिया संगमेश्वर शाखेचे “बँक मित्र”
ते बँक ऑफ इंडिया, संगमेश्वर शाखेचे अधिकृत बँक मित्र असून बँकिंग सेवा ग्रामीण भागातील नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे प्रशंसनीय कामही ते अनेक वर्षांपासून करत आहेत. वृद्ध, महिला, शेतकरी आणि दुर्गम भागातील नागरिकांना खाते व्यवहार, सरकारी अनुदाने, आधार लिंकिंग, खाते अद्ययावत करणे अशा अनेक सुविधा सुलभतेने उपलब्ध करून देण्यात त्यांनी भूमिका बजावली आहे.
बचत गट ट्रेनर म्हणून त्यांच्या कार्यशैली, शिस्तबद्ध मार्गदर्शन आणि ग्रामीण भागातील महिलांना उभारी देणाऱ्या उपक्रमांमुळे ते विशेष लोकप्रिय आहेत.
निलेश कदम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय ग्रामस्थांचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रामाणिक कार्यशैली व समाजाभिमुख दृष्टिकोनामुळे निलेश दादा सारखी व्यक्ती पंचायत समितीच्या सभागृहात गेल्यास स्थानिक प्रश्नांना वेगाने व पारदर्शक पद्धतीने न्याय मिळेल, असा विश्वास मतदारांमध्ये आहे.
“लोकांचा वाढता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आपण घेतलेल्या निर्णयातून आता माघार नाही. माझ्या कार्यावर लोकांचा असलेला दृढ विश्वास हीच माझी प्रेरणा असून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण ताकदीने उभा राहणार आहे,” असे निलेश कदम यांनी स्पष्ट केले.


