(रत्नागिरी / प्रतिनिधी)

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ता शाखेत तब्बल ५० लाख रुपयांच्या सोन्याचा अपहार उघडकीस आला असून, शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील एक संशयित आरोपी शिपाई अमोल आत्माराम मोहिते (वय ४२, रा. टिके, रत्नागिरी) याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणातील इतर दोन संशयित आरोपी शाखाधिकारी किरण विठ्ठल बारये आणि कॅशियर ओंकार अरविंद कोळवणकर मात्र पोलिसांच्या हालचालीचा सुगावा लागताच पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत. हा अपहाराचा प्रकार १८ फेब्रुवारी २०२५ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे. कर्जासाठी ग्राहकांकडून तारण ठेवलेले जवळपास ५० तोळे सोने गहाळ झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. सुरुवातीला बँकेने अंतर्गत चौकशी केली होती. त्यानंतर बँकेचे अधिकारी सुधीर प्रभाकर गिम्हवणेकर (वय ५४, रा. माळनाका, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, पोलिसांनी प्राथमिक तपास करत तिन्ही आरोपींवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३९६ (२), (४), (५) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संगनमत करून करण्यात आलेल्या या अपहारात सोन्याचे अंदाजे ५० लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. अटक केलेल्या अमोल मोहितेकडून पोलिस तपासाच्या माध्यमातून सोन्याचे दागिने कुठे आहेत किंवा त्यांचा वापर कसा केला, याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत काही दागिने पोलिसांच्या ताब्यात आले असल्याची माहिती समोर आली असली तरी उर्वरित सोन्याचा मागोवा दोन्ही फरार आरोपींच्या अटकेनंतरच लागेल, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!