(पुणे)
गेल्या अनेक वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे वाहनचालक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधण्यात येत असून सध्या सीनजी वाहनांना प्रचंड मागणी असून चारचाकी सीएनजी वाहनांची बाजारात चलती असल्याचे पाहायला मिळते. त्यातच, आता बजाज ऑटोकडून जगातील पहिली सीएनजी बाईक केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड येथे लाँच करण्यात आली.
पेट्रोल आणि सीएनजी अशी हायब्रीड बाईक असून 2 किलो सीएनजीमध्ये आपण 200 किमी प्रवास करू शकतो. तर, 2 लीटर पेट्रोल आणि 2 किलो सीएनजीमध्ये जवळपास 330 किमीचा टप्पा गाठता येईल. पेट्रोलच्या वाढत्या दराने त्रस्त झालेल्या दुचाकीस्वारांची मुक्तता होणार असून बजाजने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाईकची निर्मिती केली. या बाईकचे उद्घाटन शुक्रवार (दि.5 जुलै) रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झाले. जगातील ही पहिली सीएनजी बाईक असल्याचा दावा बजाज कंपनीने केला आहे. या बाईकमुळे दुचाकीस्वारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
बजाजच्या या सीएनजी बाईकमध्ये पेट्रोल आणि सीएनजीसाठी एकच फ्युएल कॅप कव्हर आहे. या बाईकचे बेसिक मॉडेल हे ९५ हजार रुपयांना आहे तर टॉप व्हेरीएंट मॉडेल १ लाख १० हजार रुपयांना आहे. या दुचाकीचं बुकिंग सध्या चालू झालं असून या दुचाकीचे टॉप व्हेरिएन्ट हे फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सध्या मिळणार आहेत. ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही पर्यायांवर धावते. कंपनीच्या दाव्यानुसार, कंपनीने त्यासाठी 11 वेगवेगळ्या टेस्ट केल्या आहेत.
जगातील पहिली सीएनजी बाईक Bajaj Freedom 125 मध्ये कंपनीने 125 सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन बाईकला 9.5PS ची पॉवर आणि 9.7Nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये कंपनीने 2 लिटरचे पेट्रोल फ्युएल टँक आणि 2 किलोग्रॅमची सीएनजी टँक दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, बाईक फुल टँकमध्ये (पेट्रोल+सीएनजी) 200 किमी पेक्षा जास्त अंतर कापते.
या 7 रंगांमध्ये बाईक उपलब्ध : बजाजची ही बाईक तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. Bajaj Freedom 125 बाईक डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक या दोन ब्रेकिंग सिस्टिमसह येते. ही बाईक एकूण 7 रंगामध्ये येईल. यामध्ये कॅरेबियन ब्लू, इबोनी ब्लॅक ग्रे, प्यूटर ग्रे ब्लॅक, रेसिंड रेड, सायबर व्हाईट, प्यूटर ग्रे येलो, इबोनी ब्लॅक रेड रंगाचा यामध्ये समावेश आहे.