(रत्नागिरी)
शहरातील नगर परिषदेच्या परिसरात इलेक्ट्रिक गाड्यांचा चार्जिंग पॉइंट अचानक बंद केल्याने इलेक्ट्रिक दुचाकी चालकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत दुचाकीचालकांनी विचारणा केल्यास त्यांना अधिकाऱ्यांकडून थातुर-मातुर उत्तर दिली जात आहे.
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोलच्या किमतीमुळे इलेक्ट्रिक गाड्यांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. शहरात अनेकांनी इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केल्या आहेत. मात्र या दुचाकींना चार्ज करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणीच चार्जिंग पॉईंट आहेत. यामध्ये सावरकर नाट्यगृह, नगर परिषद अशा मोजक्याच ठिकाणी शासनाने चार्जिंगची सुविधा ठेवल्याचे दिसून येते. मात्र त्यातच आता नगर परिषदच्या परिसरात मोक्याच्या ठिकाणी असणारा चार्जिंग पॉईंट बंद करण्यात आला असून नेमका येथील पॉइंट का बंद करण्यात आला असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नगर परिषदेकडून कोणतीही कल्पना न देता अचानक येथील पॉइंट बंद केल्याने अनेक इलेक्ट्रिक दुचाकी चालकांची मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे.
नगर परिषद येथील पॉइंटवर आपल्या गाड्या चार्ज करण्यासाठी येणाऱ्या चालकांना चार्जिंगविना माघारी परतावे लागत आहे. इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने चार्जिंग पॉईंट शहरातील महत्वाच्या भागात उभारण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.