(संगमेश्वर / एजाज पटेल)
चिरा भरून जाणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून या अपघातात चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात जाकादेवी -परचुरी मुख्य मार्गांवर उक्षी रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या उतारात शनिवारी दुपारी घडला आहे.
रत्नागिरी तालुक्यात येणाऱ्या चवे देऊड येथील अतुल अनंत सावंत यांच्या मालकीच्या असलेल्या चिरेखण मधून त्यांच्याच मालकीच्या असलेल्या MH-10-AW-2757 या ट्रकमध्ये चिरे भरून चालक आनंद धरसिंग राठोड हा चवे येथून परचुरी बौद्धवाडी येथे त्याच्याबरोबर चिरे उतरवण्यासाठी अन्य सहा कामगारांना ट्रकच्या कॅबिनमध्ये बसवून जात असताना संगमेश्वर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात येणाऱ्या परचुरी येथे उक्षी रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या वळण असलेल्या उतारात ट्रक चा ब्रेक निकामी झाल्याने रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाला.
अपघात झाला त्यावेळी तेथून येणाऱ्या -जाणाऱ्या वाहनामधील लोकांनी थांबून ट्रक कॅबिनमध्ये अडकलेल्या ट्रक चालक तसेच अन्य कामगारांना बाहेर काढले. या अपघात सिद्धू मोतीराम चव्हाण (वय वर्षे 32 मूळ राहणार कक्कलमेली तालुका सिंधगी जिल्हा बिजापूर) सध्या वास्तव्य चवे देऊड (रत्नागिरी )याच्या डोक्याला मार लागला होता. तर अन्य सहाजण यांना किरकोळ दुखापत झाली होती. या सर्वांना खासगी वाहनाने जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. येथे सिद्धू मोतीराम चव्हाण याचे उपचार दरम्यान मृत्यू झाले.
अपघाताची माहिती अतुल अनंत सावंत यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याला देताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, डिंगणी पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल शांताराम पंदेरे,कॉन्स्टेबल म्हस्कर, कोलगे ह्यांनी घटनास्थळी पोहचून अपघाताची पाहणी करून पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम पंदेरे करत आहेत.