( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील रमणीय किनाऱ्यावर सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम कांदळवन विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. गणपतीपुळे किनाऱ्यावर सध्या सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी गणपतीपुळे मंदिराच्या नजीकच हिरवे कापड लावून संरक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. या संरक्षण केंद्रामध्ये सागरी कासवांची अंडी ठेवली जाणार असून या अंड्यांमधून पिल्ले तयार झाल्यानंतर ती पिल्ले समुद्रापासून सुमारे 15 ते 20 मीटर अंतरावर सोडली जातात तसेच अंड्यांमधून सुमारे 45 ते 55 दिवसांनी पिल्ले तयार होतात अशी माहिती कांदळवन विभागाची वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. ठाकूर यांनी दिली.
याबाबत त्यांनी सांगितले की, सागरी किनाऱ्यावर सागरी कासवांची पिल्ले तयार होण्यासाठी हिवाळ्यात डिसेंबर ते पुढे चार महिने अंडी देण्याचा काळ अत्यंत पोषक असतो त्यामुळे या अंड्यांमधून सागरी कासवांची पिल्ले तयार होऊन त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 16 किनाऱ्यांवर सागरी संरक्षण व संवर्धन हा उपक्रम कांदळवन विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे या उपक्रमासाठी कासव मित्रांची निवड करण्यात आली असून गणपतीपुळेसाठी ऋषिकेश जोशी कासवमित्र म्हणून काम करणार आहेत. तर मालगुंडसाठी आदित्य मयेकर कासवमित्र म्हणून काम करणार असल्याची माहिती ठाकूर यांच्याकडून देण्यात आली. तसेच यापूर्वी हे काम वनविभागाच्या प्रादेशिक विभागाकडे होते, मात्र त्यानंतर आता सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम कांदळवन विभागाकडे देण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 16 सागरी किनाऱ्यावर सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन होणार आहे. याकरिता कांदळवन विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे योग्य ती पाहणी करण्यात आली असून संबंधित सागरी किनाऱ्यावर कासव मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे.