(रत्नागिरी / प्रतिनिधी)
साडवली (देवरुख) विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र सुरू व्हावे, यासाठी या केंद्राचे अध्यक्ष कमलाकर मसुरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही त्यांचे हे उपोषण सुरू होते. मात्र, त्यांच्या या उपोषणाची दखल अजूनही प्रशासनाने घेतलेली नाही. तसेच उद्योगमंत्री सामंत यांनी देखील दखल घेतली नसल्याचे चित्र आहे. हे केंद्र सुरू होत नाही, तोपर्यंत आपण हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे मसुरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेंतर्गत देवरुख नजीकच्या साडवली एमआयडीसीत सामूहिक सुविधा केंद्र उभारले आहे. शासनाने मशिनरी दिल्या असून सभासदांच्या हिश्श्यातून जमीन व इमारतीही बांधण्यात आल्या आहेत. मात्र शासनाने पुरवठा केलेल्या मशिन्सपैकी मुख्य मशीनची चाचणी होऊनही अद्याप ते सुरू करून दिलेले नाही. त्यामुळे साडवली येथील संपूर्ण सामूहिक सुविधा केंद्र बंद आहे. या उद्योगाच्या संचालक व सभासदांनी सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च केले आहे. मात्र, सामूहिक सुविधा केंद्र सुरु नसल्याने या सामूहिक सुविधा केंद्राचे १ कोटी ९० लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत त्यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नसल्याने मसुरकर यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता. मात्र, अजूनही प्रशासनाने त्यांच्या या उपोषणाची दखल घेतलेली नाही. हे केंद्र सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे मसूरकर यांनी सांगितले.
उद्योगमंत्री दुर्लक्ष का करतायत?
उद्योग विभागाकडून जिल्ह्यातील काही भागात एमआयडीसी उभारण्याचा प्रयत्न आहे. मात्र देवरूख सारख्या परिसरात साडवली एमआयडीसीमधील सामूहिक सुविधा केंद्रच बंद आहे. सुमारे सव्वाकोटी रुपये पाण्यात गेले असून आदींच्याच एमआयडीसीमधील समस्यांनी बोजवारा उडत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेंतर्गत विषय येत असल्याने यापूर्वीच उद्योगमंत्र्यांची चार वेळा भेट घेतली, त्यानंतर बैठक आयोजित केली त्यात स्वतः उद्योगमंत्री उपस्थित नव्हते, असे उपोषणकर्ते मसुरकर यांनी सांगितले. उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून अशा गंभीर विषयाकडे दुर्लक्ष का होतेय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
उद्योग विभागाच्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा...
सामुहिक सुविधा केंद्र कार्यन्वित करून देण्याची जबाबदारी उद्योग विभागाच्या विभागीय कार्यालय ठाणे व जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी यांची होती. मुख्य मशीन वेळेत पुरवठा न करणाऱ्या कंपनीवर कोणतीही कारवाई न करता त्या कंपनीला पाठीशी घातले. मशीन वेळेत न पुरवल्यामुळे व अद्याप चालू करून न दिल्यामुळे कंपनीचे अतोनात नुकसान व उपासमारीची वेळ आली आहे. कंपनी कार्यान्वित करून देण्यासाठी उद्योग विभागाकडे ४ वर्षे सतत पाठपुरावा करूनही दखल घेतली नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलन करण्यापूर्वी देण्यात आलेल्या इशारापत्रातून करण्यात आली आहे.