(दापोली)
तालुक्यातील चाकूने वार केल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. पाडले गावातील सरपंचाने धारदार हत्यारांनी वार केल्याची घटना गुरुवारी सकाळी इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रा.लि.च्या साईटवर घडली. या हल्ल्यात सुभाष राजेंद्र लोणारी (३६) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी सरपंच रवींद्र सातनाक याला पोलिसांनी अटक केली आहे.
सुभाष राजेंद्र लोणारी हे आंजर्ले पाडले गावच्या सीमेवरील शार्प स्किल इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रा.लि. या कंपनीच्या साईटवर लायझनिंग प्रमुख म्हणून काम पाहतात. या साईटचे काम सुरू असल्यापासून पाडले गावचे सरपंच रवींद्र सातनाक वरिष्ठ अधिकारी दीपेंद्र गुप्ता यांच्याकडून खंडणीच्या स्वरूपात पैसे घेत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. दीपेंद्र गुप्ता यांची बदली झाल्याने दीड महिना त्यांचे कामही सुभाष लोणारी पाहत आहेत. गुरुवारी सकाळी रवींद्र सातनाक याने साईटवर सुरू असलेल्या कामाबद्दल खंडणी स्वरूपात पैशांची मागणी केली. हे पैसे देण्यास सुभाष लोणारी यांनी नकार दिला. त्यानंतर सातनाक याने धमकी देत चाकूने छातीवर व दंडावर वार केले. या हल्ल्यात सुभाष लोणारी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच दापोलीचे पोलिस अधिकारी आर. बी. मोहिते यांनी रुग्णालयात जाऊन जबाब घेतला. या प्रकरणी दापोली पोलिसांनी सरपंच रवींद्र सातनाक यांच्यावर भारतीय दंड विधान कायदा कलम ३०७, ३८६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक यादव करीत आहेत.