(संगमेश्वर / एजाज पटेल)
देशात व राज्यात हल्ली महिला अत्याचाराचे प्रकार वाढत चालले आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या बदलापूर येथील अत्याचार घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असताना व हे प्रकरण ताजे असतानाच संगमेश्वर तालुक्यात संतापजनक तसेच गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. तालुक्यातील वांद्री येथील एका शाळेतील शिक्षकच बनला भक्षक आहे. या शाळेतील नराधम शिक्षक हा पाचवी व सहावी वर्गात शिकणाऱ्या तीन ते चार मुलींचा विनयभंग करत असल्याची घटना समोर आली असून त्या नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील शाळेतील हा शिक्षक काही दिवसांपासून त्याच शाळेतील पाचवी व सहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींबरोबर अश्लील वर्तन व शारीरिक छेडछाड करत असल्यानी त्या पीडित मुलींनी कंटाळून सारा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. हा धक्कादायक प्रकार ऐकताच त्याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी शाळेत शाळा व्यवस्थापन समिती, पालक तसेच ग्रामस्थांच्या सभेचे तातडीने आयोजन करण्यात आले होते.
या सभेत त्या शिक्षकाला मुलींनी केलेल्या तक्रारी संदर्भात जाब विचारला असता, चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे तो नराधम शिक्षक आपण असे कृत्य केलेलेच नाही, अशा अविरभावात उत्तरे देत होता. त्यामुळे उपस्थित पालक व ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. आपण करत असलेल्या बनवाबनवीमुळे उपस्थित पालक आक्रमक होत आहेत हे लक्षात येताच व आपले काही खरे नाही, आपण कितीही खोटे सांगितले तरी काही उपयोग नाही. आपले बिंग तर फुटलेय, आता आपण यातून सहीसलामत आपण सुटू शकत नाही. आणि जर का उपस्थितांच्या रागाचा पारा चढला तर मात्र नको ते होईल न पेक्षा खरं ते मान्य करून माफी मागून सुटका करावी या उद्देशाने की काय? ते किळसवाणे कृत्य त्याने मान्य केले. शिक्षकी पेश्याला आणि गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य करणाऱ्या त्या नराधम शिक्षकाने सत्य ते ओकून माफीची दयावया सुरु केली.
ही घटना काही वेळातच सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आणि जमाव वाढू लागला. पालक, व ग्रामस्थांनी पूर्णपणे संयम राखत घडलेल्या घटनेमुळे अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत घडलेल्या घटनेची माहिती संगमेश्वर पोलिस तसेच रत्नागिरी पोलिसांना दिली. प्रकरण गंभीर असल्याने डी.वाय.एस.पी. तसेच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करत त्या नराधम शिक्षकाला ताब्यात घेत पोलिसांनी त्याला संगमेश्वर पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाईसाठी आणले. यावेळी पोलीस ठाणे आवारातसुद्धा मोठा जमाव जमला होता. घडलेल्या घटनेमुळे अनुचित प्रकार व कोणताही उद्रेक होऊ नये याकरिता रत्नागिरी येथून 30 RCP पोलिसांची कुमक पाचरण करण्यात आली होती. मात्र जमलेल्या जमावाने संयम राखला. तरीही DYSP माईन यांनी जमावाला शांत रहाण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन करून दोषीवर गुन्हा दाखल करून अटक करणार असल्याचे सांगितले.