(संगमेश्वर)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आता खड्ड्यांबरोबर धुळीचा सामना करावा लागत आहे. संगमेश्वर तालुक्यातील माभळे ते कोळंबे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रमाण वाढल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. संगमेश्वर तालुक्यातील काही भागात चौपदरीकरण पूर्ण झाले असले, तरी अनेक ठिकाणी अर्धवट कामामुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. चौपदरीकरणाच्या कामांतर्गत पुरेशी उपाययोजना केली जात नसल्याने प्रवाशांना व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
खड्यांमधून बाहेर आलेले दगड ट्रकच्या चाकातून उडत आहेत. हे दगड प्रवासी किंवा दुचाकीस्वारांना बसून मार बसण्याची भीती आहे. आधीच खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या प्रवाशांना आता धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे